Two youths dead in Verna accident | वेर्णा अपघातात दोन तरुणांचा अंत

वेर्णा अपघातात दोन तरुणांचा अंत

वास्को: गुरूवारी (दि.१४) पहाटे वेर्णा भागात दुचाकी व अज्ञात वाहनामध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा दुर्देवी अंत झाला. विलास कृष्णानंद कलगुटकर व जोंन्सन केस्तेलीनो असे त्या मरण पोचलेल्या तरुणांची नावे असून त्यांच्या दुचाकीला धडक दिल्यानंतर अज्ञात वाहनचालकाने वाहनासहीत घटनास्थळावरून पोबारा काढला. अपघात केल्यानंतर घटनास्थळावरून पलायन केलेल्या त्या अज्ञात वाहन चालकाची गुरूवारी उशिरा रात्री पर्यंत ओळख पटलेली नसून वेर्णा पोलीस त्याचा सध्या शोध घेत आहेत.


पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार गुरूवारी पहाटे ३ च्या आसपास सदर अपघात घडला. वेर्णा भागात राहणारा ३३ वर्षीय विलास ‘पल्सर’ दुचाकी ने (क्र: जीए ०६ सी ०८८५) त्याचा ३२ वर्षीय मित्र जोंन्सन ला घेऊन जात होता. वेर्णा चर्च परिसरातून त्यांची दुचाकी पिर्णी जंक्शनच्या जवळ पोचली असता एका अज्ञात वाहनाने त्यांना जबर धडक दिली. सदर अपघातात विलास व त्याचा मित्र जोंन्सन रस्त्यावर फेकले गेल्याने ते गंभीर रित्या जखमी झाले. अपघात घडल्याचे त्या अज्ञात वाहनातील चालकाला समजताच त्यांनी वेळ न करता घटनास्थळावरून पोबारा काढला. ह्या भीषण अपघातातील जखमी झालेल्या विलास व जोंन्सन यांना नंतर त्वरित मडगावच्या हॉस्पिसीयो इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र येथे येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. मरण पोचलेले दोघेही जण वेर्णा भागात राहत असून विलास हा कारवार, कर्नाटक तर जोंन्सन शिमोगा, कर्नाटक येथील मूळ रहीवाशी असल्याचे सांगितले.

अपघातानंतर पोबारा काढलेल्या त्या अज्ञात वाहन चालकाची गुरूवारी उशिरा पर्यंत पोलीसांना ओळख पटलेली नसल्याची माहीती सूत्रांनी दिली. त्याला गजाआड करण्यासाठी पोलीस सर्व मार्गाने त्याचा शोध घेत आहेत. सदर अपघात प्रकरणात वेर्णा पोलीसांनी भादस २७९, ३०४(ए) तसेच वाहतूक कायद्याच्या १३४ (ए) कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक हरीष मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकरणाचा अधिक तपास चालू आहे.

Web Title: Two youths dead in Verna accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.