युतीबाबत पंतप्रधान मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास: सुदिन ढवळीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 13:00 IST2025-03-31T12:59:22+5:302025-03-31T13:00:21+5:30

जे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतले, ज्या योजना मार्गी लावल्या, त्यास मगोचा पाठिंबा आहे.

trust in pm modi amit shah and cm devendra fadnavis regarding alliance said sudin dhavalikar | युतीबाबत पंतप्रधान मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास: सुदिन ढवळीकर

युतीबाबत पंतप्रधान मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास: सुदिन ढवळीकर

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : 'युतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला असेल तर मी समजू शकतो, असे मगोचे ज्येष्ठ नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले.

ढवळीकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी प्रियोळमध्ये केलेले विधान हे भाजप कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आहे. कार्यकर्ता मेळाव्यामध्ये नक्की काय घडले हे मला ठाऊक नाही. परंतु युतीबाबत वरील तीन नेत्यांनी जर या गोष्टीवर शिक्कामोर्तब केले असेल तरच भी विश्वास ठेवीन. युतीसंदर्भात आम्ही सकारात्मकच आहे. यासंदर्भात जो काही निर्णय घ्यायचा असेल तो महत्त्वाच्या वेळी होईलच. राष्ट्रीय स्तरावरील भाजपचे जे काम चालू आहे. त्या कामाने आम्हीसुद्धा भारावलेले आहोत. जे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतले, ज्या योजना मार्गी लावल्या, त्यास मगोचा पाठिंबा आहे.

युती भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी केलीय : दीपक

'भाजप-मगो युती ही भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी घडवून आणलेली आहे. मुख्यमंत्र्यांकडे आमचे संबंध अत्यंत चांगले आहेत. आमच्यात कोणतेही हेवेदावे नाहीत. त्यांनी हे विधान का केले हे तुम्ही त्यांनाच विचारलेले बरे' असे मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी स्पष्ट केली.

दीपक ढवळीकर म्हणाले की, 'आम्ही पूर्ण कार्यकाळ भाजपसोबतच राहू, असा शब्द भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाला दिला आहे. युतीचा धर्म आम्ही पाळला आहे. दोन्ही पक्ष समविचारी आहेत व यापुढेही नवभारत घडवण्याच्या कामात आम्हाला भाजपची साथ द्यायची आहे.

कारण केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह चांगले काम करत आहेत.' दीपक पुढे म्हणाले की, 'प्रियोळ मतदारसंघात अनुसूचित जमार्तीची (एसटी) संख्या जास्त आहे. हा मतदारसंघ एसटींना राखीव होणार की नाही, हे अजून स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे यावर आताच बोलणे योग्य नव्हे.'

भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी मेळावे सुरू करुन आतापासूनच तयारी चालवली आहे, याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, 'मगोच्याही सहा मतदारसंघांमध्ये समित्या स्थापन झालेल्या आहेत. फक्त आम्ही त्या अजून जाहीर केलेल्या नाहीत. मे, जूनपासून आमचेही मेळावे सुरू होतील.'

'आमंत्रणावरूनच मेळाव्यांना गेलो'

दीपक ढवळीकर म्हणाले की, 'भाजपला आम्ही कुठेही दुखवलेले नाही. प्रियोळमध्ये महिला मेळाव्यासाठी आमंत्रण आले म्हणून मी गेलो. त्याआधी सभापती रमेश तवडकर यांनी बोलावले म्हणून दोन वेळा गेलो. इतर मतदारसंघांमध्ये भाजपचे काम चालू आहे, तसेच मगोचेही काम चालू आहे. मगो कुठले मतदारसंघ मागणार, भाजप कोणते मतदारसंघ देणार यावर चर्चेची ही वेळ नव्हे.'

 

Web Title: trust in pm modi amit shah and cm devendra fadnavis regarding alliance said sudin dhavalikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.