धार्मिक स्थळे तोडफोड प्रकरण : संशयित फ्रान्सिस्को निर्दोष, आरोप निश्चित करण्यासाठी पुराव्यांचा अभाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 19:36 IST2017-12-01T19:35:48+5:302017-12-01T19:36:07+5:30
दीडशेच्या आसपास धार्मिक स्थळांची विटंबना केल्याच्या आरोपावरुन गोवा पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वी अटक केलेल्या फ्रान्सिस्को परेरा उर्फ बॉय याला मडगावातील प्रथम वर्ग न्यायालयाने चार प्रकरणात आरोप निश्चितीपुर्वीच निर्दोष मुक्त केल्याने पोलिसांचा दावा फोल ठरला आहे.

धार्मिक स्थळे तोडफोड प्रकरण : संशयित फ्रान्सिस्को निर्दोष, आरोप निश्चित करण्यासाठी पुराव्यांचा अभाव
- सुशांत कुंकळयेकर
मडगाव : दीडशेच्या आसपास धार्मिक स्थळांची विटंबना केल्याच्या आरोपावरुन गोवा पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वी अटक केलेल्या फ्रान्सिस्को परेरा उर्फ बॉय याला मडगावातील प्रथम वर्ग न्यायालयाने चार प्रकरणात आरोप निश्चितीपुर्वीच निर्दोष मुक्त केल्याने पोलिसांचा दावा फोल ठरला आहे.
मे ते जुलै या दरम्यान दक्षिण गोव्यात पाठोपाठ धार्मिक स्थळांची मोडतोड सुरु होती. त्यामुळे धार्मिक भावनाही उचंबळून आल्या होत्या. अशा परिस्थितीत मडगावपासून 22 कि.मी. अंतरावर असलेल्या कुडचडे येथील टॅक्सी ड्रायव्हर फ्रान्सिस्को याला जुलै महिन्यात कुडचडे पोलिसांनी अटक केली होती. कुडचडे येथील दफनभूमीतील सुमारे 100 क्रॉसची मोडतोड केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याने मागच्या दहा वर्षात दीडशेच्या आसपास धार्मिक स्थळांची आपण मोडतोड केल्याची कबुली पोलिसांना दिली होती.
मात्र, या दीडशेपैकी ज्या चार प्रकरणात पोलिसांनी बॉयच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. त्या चारही प्रकरणातून आरोप निश्चितीपूर्वीच त्याला निर्दोष मुक्त करण्यात आले. या चार प्रकरणातील तीन प्रकरणे रस्त्याच्या बाजूला असलेल्या क्रॉसांच्या मोडतोडीची असून चौथे प्रकरण 2009 साली वेरोडा-कुंकळ्ळी येथील प्रसिद्ध सात देवळांच्या मोडतोडीचे आहे. या प्रकरणात 2 जुलै 2017 रोजी पर्वत पारोडा येथे असलेल्या वालंकिणी सायबिणीच्या क्रॉसच्या तसेच त्याच दिवशी चांदर येथील आल्मा खुरीसच्या प्रकरणाचा समावेश आहे. प्रथमवर्ग न्यायाधीश अनुराधा आंद्राद यांनी सदर संशयिताला तीन प्रकरणातून तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पुजा सरदेसाई यांनी एका प्रकरणातून त्याला निर्दोष मुक्त केले. या चार प्रकरणात संशयिताच्यावतीने अॅड अंजू शंकर आमोणकर व अॅड. एरीक कुतिन्हो यांनी काम पाहिले.
सात देवळांच्या मोडतोडीसंदर्भात युक्तीवाद करताना अॅड. कुतिन्हो यांनी याच प्रकरणात यापूर्वी पोलिसांनी अन्य दोघांना अटक केली होती. याकडे लक्ष वेधताना या प्रकरणात कुठलाही पुरावा नसताना फ्रान्सिस्कोला त्यात गुंतविण्यात आल्याचा दावा केला. तर अॅड. आमोणकर यांनी पोलिसांचा दावा केवळ संशयिताने दिलेल्या जबानीवर आधारित आहे. मात्र संशयिताने दिलेली जबानी पुरावा म्हणून ग्राह्य धरत नाही. या प्रकरणात कुणीही प्रत्यक्ष साक्षीदार नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.