काही टॅक्सीवाल्यांच्या दादागिरीने पर्यटन बदनाम, असे प्रकार खपवून घेणार नाही; रोहन खंवटेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 07:39 IST2025-11-13T07:39:06+5:302025-11-13T07:39:33+5:30
'सर्व मतदारसंघातील आमदारांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

काही टॅक्सीवाल्यांच्या दादागिरीने पर्यटन बदनाम, असे प्रकार खपवून घेणार नाही; रोहन खंवटेंचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील टॅक्सीचालकांच्या दादागिरीमुळे पर्यटन क्षेत्रावर विपरीत परिणाम होत आहे. यापुढे पर्यटन क्षेत्राची बदनामी सहन केली जाणार नाहे,' असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी बुधवारी मंत्रालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. 'सर्व मतदारसंघातील आमदारांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
मंत्री खंवटे म्हणाले, 'टॅक्सीच्या विषयावर सर्व आमदारांनी मतदारसंघातील राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा. सर्व टॅक्सी ऑपरेटरांच्या सहभागातून नवीन धोरण तयार केले जात आहे. ज्यांनी जाणूनबुजून अडथळे निर्माण केले, अशा त्रासदायक घटकांवर कठोर कारवाई करण्यात येईल. राज्याच्या पर्यटन प्रतिमेला धक्का बसू नये, म्हणून सरकार ठाम पावले उचलत आहे आणि टॅक्सीचा विषय निकाली काढण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत.
खंवटे म्हणाले की, 'राज्यात परदेशी पर्यटकांची संख्या वाढली आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात एकूण ३४ चार्टर विमाने गोव्यात आली आहे. त्यामुळे विदेशी पर्यटकांची तसेच देशी पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पर्यटनाची बदनामी थांबवावी.'
प्रत्येक कार्यक्रम महत्त्वाचा : पर्यटनमंत्री
मंत्री खंवटे म्हणाले की, 'राज्यात होणारा प्रत्येक कार्यक्रम राज्याच्या पर्यटनासाठी महत्त्वाचा आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी), सेरेन्डिपिटी आर्ट फेस्टिव्हल तसेच इतर सर्व उत्सव राज्याच्या पर्यटन क्षेत्राला बळकटी देतात. राज्याचे पर्यटन योग्य दिशेने वाटचाल करत आहे आणि वर्षभर पर्यटकांना आकर्षित करण्याच्या उद्दिष्टाने सरकार काम करत आहे. इफ्फीसंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत राज्याच्या हिताचे काय आहे, हे उत्तम प्रकारे जाणतात आणि त्यानुसारच निर्णय घेत आहेत.'