वाघाच्या मृत्यूची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल, चौकशीचे दिले आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 14:21 IST2020-01-08T14:19:31+5:302020-01-08T14:21:06+5:30

म्हादई अभयारण्य हे गोवा व कर्नाटकच्या सीमेवर आहे.

Tiger Found Dead In Goa Wildlife Sanctuary | वाघाच्या मृत्यूची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल, चौकशीचे दिले आदेश 

वाघाच्या मृत्यूची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल, चौकशीचे दिले आदेश 

पणजी - शांत आणि सुशिक्षित गोवा म्हणून या राज्याची देशभर ख्याती आहे. पण चक्क म्हादई अभयारण्यातच दोन पट्टेरी वाघमृत्यूमुखी पडल्याने गोव्याची अब्रू चव्हाट्यावर टांगली गेल्याची प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमींमध्ये व्यक्त होत आहे. वाघांच्यामृत्यूच्या घटनेची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गंभीर दखल घेतली व सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

म्हादई अभयारण्य हे गोवा व कर्नाटकच्या सीमेवर आहे. गोव्यातील जंगलांमध्ये पट्टेरी वाघ आहेत की नाही याविषयी काही वर्षापूर्वी वाद होता पण वन खात्याने लावलेल्या कॅमेऱ्यांमध्ये पाच वाघ टीपले गेले. त्यानंतर गोव्यात व्याघ्र प्रकल्प राबविला जावा अशा प्रकारच्या सूचना येऊ लागल्या. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रीपदी असताना 2016 साली राज्य वन्यप्राणी मंडळाच्या  बैठकीत व्याघ्र प्रकल्पाविषयीचा प्रस्तावही चर्चेस आला होता. नंतर पर्रीकर आजारी पडले व हा प्रस्तावही बारगळला.

गेल्या आठवड्यात सत्तरी तालुक्यातील ठाणो पंचायत क्षेत्रत म्हणजेच म्हादई अभयारण्यातील गोळावली गावात मेलेल्या अवस्थेत सापडला. चार वर्षाचा तो वाघ विषबाधेमुळे मेल्याचा प्राथमिक निष्कर्ष वन खात्याने काढला. या प्रकरणी सखोल चौकशी करा, असा आदेश मग मुख्यमंत्री सावंत यांनी वन खात्याला दिला. त्या वाघाचे काही अवयव काढून चाचणीसाठी वन खात्याने हैद्राबाद व देहरादून येथील प्रयोगशाळांना पाठवले आहेत. या वाघाची नखे अगोदरच गायब झालेली असल्याचे खात्याला आढळून आले. तथापि, खात्याची चौकशी सुरू असतानाच मंगळवारी सायंकाळी वन खात्याला त्याच जागेत आणखी एक पट्टेरी वाघ मेलेल्या अवस्थेत आढळल्याने वन खात्यात आणि एकूणच सरकारी पातळीवर खळबळ उडाली आहे. 2009 साली सत्तरी तालुक्यातच वाघाची हत्त्या झाली होती. त्यावेळी आरोपींना अटकही झाली होती. त्यानंतर आता दोन वाघ मृत्यूमुखी पडल्याने वन खात्याने चार संशयीतांना हेरले आहे. कुणी तरी मुद्दाम विष घालून वाघांना मारले की काय याचा शोध वन खाते घेत आहे.
 

Web Title: Tiger Found Dead In Goa Wildlife Sanctuary