गोव्यात परवा भाजपाच्या खासदारांचे उपोषण, १८ रोजी कार्यकारिणी बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 21:42 IST2018-04-10T21:39:51+5:302018-04-10T21:42:56+5:30
गोव्यातही भाजपाचे खासदार श्रीपाद नाईक (केंद्रीय आयुषमंत्री) , नरेंद्र सावईकर व विनय तेंडुलकर परवा म्हणजेच गुरुवारी (दि.१२) येथील आझाद मैदानावर सकाळी १0 ते सायंकाळी ५ उपोषण करणार आहेत.

गोव्यात परवा भाजपाच्या खासदारांचे उपोषण, १८ रोजी कार्यकारिणी बैठक
पणजी : गोव्यातही भाजपाचे खासदार श्रीपाद नाईक (केंद्रीय आयुषमंत्री) , नरेंद्र सावईकर व विनय तेंडुलकर परवा म्हणजेच गुरुवारी (दि.१२) येथील आझाद मैदानावर सकाळी १0 ते सायंकाळी ५ उपोषण करणार आहेत. संसदेत काँग्रेसने गोंधळ घालून कामकाजात व्यत्यय आणल्याच्या निषेधार्थ हे उपोषण आहे.
पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सदानंद तानावडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा येत्या महिन्याच्या दुस-या आठवड्यात गोवा भेटीवर येणार आहेत. शहा यांची ही भेट आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असेल. मेळावा घेऊन ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही करणार आहेत.
येत्या १८ रोजी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होईल. पक्षाचे अखिल भारतीय सरचिटणीस बी. एल. संतोष, संघटन सचिव विजय पुराणिक, निरीक्षक अविनाश राय खन्ना हे या बैठकीला उपस्थित राहतील. आगामी लोकसभा निवडणुकीनिमित्त संघटना मजबूत करण्यासाठी हाती घ्यावयाचे उपक्रम निश्चित करण्यासाठी तसेच शहा यांच्या भेटीचा कार्यक्रम आखण्यासाठी या बैठकीचे आयोजन आहे.
पीडीए आंदोलनाबाबत काँग्रेसवर आरोप
पीडीएच्या प्रश्नावर काँग्रेसच आंदोलकांना भडकावित असल्याचा आरोप तानावडे यांनी केला. जाहीर सभा तसेच एकूणच आंदोलनात काँग्रेसचा हात आहे आणि काँग्रेसच आगित तेल ओतत असल्याचा आरोप त्यांनी केला. ताळगांव आधीही पीडीएचा भाग होता असे नमूद करुन भाजपाचे मंडल अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक यांनी जे काही विधान केले आहे ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. पक्षाचे नव्हे, असे तानावडे एका प्रश्नावर म्हणाले.
दरम्यान, अमेरिकेत उपचार घेत असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीबद्दल विचारले असता पर्रीकर हे उपचारांना प्रतिसाद देत असून मेमध्ये गोव्यात परतण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.