'ती' दुकाने आता चतुर्थीनंतर स्थलांतरित करणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 07:37 IST2025-08-23T07:36:39+5:302025-08-23T07:37:18+5:30
धोकादायक बनलेल्या नगरपालिका इमारतीमधील विक्रेत्यांना प्रशासनाने सोमवारी ७२ तासांच्या आत दुकाने खाली करण्याचा आदेश दिला होता.

'ती' दुकाने आता चतुर्थीनंतर स्थलांतरित करणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा :गणेश चतुर्थीच्या धामधुमीत दुकाने स्थलांतरित करण्याचा आदेश हाती पडलेल्या फोंडा नगरपालिका इमारतीमधील दुकानदारांना दिलासा मिळाला आहे. समाज कार्यकर्ते डॉ. केतन भाटीकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांसोबत याबाबतीत शिष्टाई केली. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार आता ती दुकाने चतुर्थी झाल्यानंतरच स्थलांतरित करण्यात येतील.
सविस्तर वृत्तानुसार, धोकादायक बनलेल्या नगरपालिका इमारतीमधील विक्रेत्यांना प्रशासनाने सोमवारी ७२ तासांच्या आत दुकाने खाली करण्याचा आदेश दिला होता. दुकानदारांनी चतुर्थीच्या दरम्यान त्यांना जुन्या इमारतीत व्यवसाय करून द्यावा अशी विनंती केली होती. प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने विक्रेत्यांनी डॉ. केतन भाटीकर यांच्या माध्यमातून गुरुवारी साखळी येथे मुख्यमंत्र्यांचे भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी विक्रेत्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांना तात्पुरता दिलासा देताना, चतुर्थी नंतरच दुकाने स्थलांतरित करण्याचे आश्वासन दिले.
हेच तर व्यवसाय करण्याचे दिवस
अन्य एक विक्रेते म्हणाले की, चतुर्थीला काही दिवसांचा कालावधी असताना अचानक दुकाने दुसरीकडे हलवणे शक्यच नाही. कारण दुकाने उभी करायलाच दोन-तीन दिवस जातील. हे दिवस आमचे व्यवसाय करायचे आहेत. आम्ही उधारी व कर्जाच्या माध्यमातून सामान भरून ठेवले आहे. जर अचानक जागा स्थलांतरित झाल्यास आमच्या ग्राहकांची दिशाभूल होईल व आमचे ग्राहक दुसरीकडे जातील. म्हणूनच आम्ही ही विनंती केली होती.
मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
साखळीतून परतल्यानंतर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष घारू सावंत माहिती देताना म्हणाले की, फक्त चतुर्थी आणि अन्य सणाच्या दरम्यानच या इमारतीमधील दुकानदारांना जास्त व्यवसाय होत असतो. आता चतुर्थी तोंडावर आहे. यादरम्यान अचानक नवीन ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आमचे अवसान गळाले होते. आम्ही प्रशासनाला स्वतःहून चतुर्थी जातो असे सांगितलेले असतानाही नगरपालिका प्रशासनाने दुकाने हटविण्यासंबंधी सर्व हालचाल केल्याची माहिती आम्हाला मिळाली. याबाबत मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद देत चतुर्थी नंतरच दुकाने हलविण्यात येतील असे आश्वासन दिले आहे.