'त्या' कॅसिनोवाल्यांना पोलिसांचे समन्स नाहीत; ईडी अधिकाऱ्यांच्या प्रकरणात कारवाईकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2024 12:36 IST2024-12-17T12:35:39+5:302024-12-17T12:36:30+5:30
तक्रार नोंद करूनही या प्रकरणात पोलिसांनी अद्याप समन्स बजावलेले नाही.

'त्या' कॅसिनोवाल्यांना पोलिसांचे समन्स नाहीत; ईडी अधिकाऱ्यांच्या प्रकरणात कारवाईकडे लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : छापा टाकण्यासाठी आलेल्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांना डांबून ठेवून सरकारी कामकाजात अडथळा आणून धमकी देणाऱ्या कॅसिनो प्राईडवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने आश्र्चय व्यक्त केले जात आहे. तक्रार नोंद करूनही या प्रकरणात पोलिसांनी अद्याप समन्स बजावलेले नाही.
मांडवीतील कॅसिनो प्राईडवर ईडीच्या बंगळुरू कार्यालयातील अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. मात्र, या छाप्यावेळी ईडीचे अधिकारी स्वतःच फसले. कॅसिनो मालकाने बाऊन्सरना सांगून या अधिकाऱ्यांना कॅसिनोमधील एका खोलीत डांबून ठेवून धमकी दिली. या प्रकरणात नंतर अधिकाऱ्यांनी पणजी पोलिसांत कॅसिनो प्राईडविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार नुसार गुन्हाही गुन्हाही नोंद केला. मात्र, पुढील चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलेले नाही.
दरम्यान, कायद्याअंतर्गत सहा वर्षांहून कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यासाठी तातडीने अटक करण्याची गरज नाही. यामुळे कॅसिनोमधील कर्मचाऱ्यांना अद्याप समन्स बजावण्यात आलेले नाही. ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यांनी अटकपूर्व जामिनासाठीही अर्ज केले नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, संशयितांना आज मंगळवारी समन्स बजावण्यात येतील.