तिसरा जिल्हा, मुख्यालय केपेत: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 08:18 IST2025-12-31T08:17:17+5:302025-12-31T08:18:11+5:30
धारबांदोडा, सांगे, केपे, काणकोण या चार तालुक्यांचा समावेश

तिसरा जिल्हा, मुख्यालय केपेत: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील बहुप्रतिक्षित तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय केपे येथे असणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी सर्वपक्षीय बैठकीनंतर दिली. या तिसऱ्या जिल्ह्यात धारबांदोडा, सांगे, केपे आणि काणकोण हे तालुके समाविष्ट करण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, नव्या जिल्ह्याच्या निर्मितीबाबत सरकारकडून प्राथमिक चर्चा पूर्ण झाली असून, प्रशासकीय सोय आणि नागरिकांच्या सोयीसाठी केपे हे मुख्यालय म्हणून अधिक योग्य ठरणार आहे. यापूर्वी सरकारने कुडचडे हे मुख्यालय करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता त्यात बदल करण्यात आला आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आरोप केला की, विरोधकांना चर्चा करण्यासाठी वेळ दिला नाही आणि घाईघाईने निर्णय घेतला गेला. मात्र, मुख्यमंत्री सावंत यांनी हे आरोप फेटाळले. ते म्हणाले की विरोधकांना सर्व माहिती उपलब्ध होती आणि विधानसभेतही यावर चर्चा झाली होती. काँग्रेस आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी यापूर्वीच केपे हेच तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय करावे, अशी जोरदार मागणी केली होती.
काणकोणकरवासीयांच्या समस्या वाढणार
तिसरा जिल्हा हवा की नको हा वादाचा मुद्दा नाही. परंतु या तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय कुठे असावे याबाबत वाद आहेत. काणकोण तालुक्यातील लोकांसाठी तर हाच मुख्य मुद्दा आहे. काणकोणहून केपेला जाणे हा द्रविडी प्राणायामासारखा प्रकार असून किमान दोन बसगाड्या बदलून जावे लागेल.
याउलट मडगावला थेट जाणे या भागातील लोकांना शक्य आहे. तिसऱ्या जिल्ह्याविषयी चर्चा सुरू होती, तेव्हाच काणकोणमध्ये याविषयी बैठका घेतल्या जात होत्या. तिसऱ्या जिल्ह्यात काणकोणचा समावेश करण्यास लोकांनी प्रखर विरोध दर्शविला होता. गोवा फॉरवर्डचे प्रशांत नाईक यांनीही तिसऱ्या जिल्ह्यात काणकोणचा समावेश करण्यासाठी तीव्र विरोध दर्शविला आहे. मात्र, काणकोणचे आमदार व राज्याचे क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी अजून तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय कुठे हे निश्चित झाले नसल्याचे म्हटले आहे.
चार तालुक्यांतील प्रमुख गावे
सांगे तालुक्यातील सांगे, उगे, नेत्रावळी, साळावली, रिवण, केपे तालुक्यातील केपे, कुडचडे, सावर्डे, फातर्पा, बाळ्ळी, काणकोण तालुक्यातील पाळोळे, आगोंद, लोलये, खोला, पैंगीण, धारबांदोडा तालुक्यातील धारबांदोडा, शिगाव, मोले, साकोर्डा, सुर्ला अशा गावांचा यात समावेश आहे.
विरोधकांच्या सूचना विचारात घेणार
गोव्यात तिसरा जिल्हा निर्माण करण्याच्या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेताना विरोधी पक्षनेते आणि विरोधी आमदारांच्या सूचनांचा विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी सांगितले.
ते म्हणाले की, सरकारने नेमलेल्या समितीने तिसऱ्या जिल्ह्याच्या व्यवहार्यतेचा अभ्यास केला आहे. या समितीने जिल्ह्याच्या सीमा, खर्च आणि प्रशासकीय परिणाम यांचा सविस्तर आढावा घेतला आहे.
सुरुवातीला काही खर्च येणार असला तरी तिसरा जिल्हा झाल्यास प्रशासन अधिक बळकट होईल, सेवा जलद मिळतील आणि केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ लोकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
तिसऱ्या जिल्ह्याच्या नावाची औपचारिक घोषणा उद्या केली जाईल. यासंदर्भातील अधिसूचनाही जारी करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
काणकोणहून आक्षेप
तिसरा जिल्हा बनविण्याचा प्रस्ताव हा फार जुना आहे आणि तिसऱ्या जिल्ह्याबाबत वाद फारसे नाहीत. परंतु तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय हा वादाचा मुद्दा ठरू शकतो. काणकोणकरांनी तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय काणकोणात असावे, अशी मागणी केली होती. त्याचबरोबर, मडगाव चालेल, असे काही लोकांनी स्पष्ट केले आहे. केपे मुख्यालय करण्याऐवजी काणकोणचा तिसऱ्या जिल्ह्यात समावेशच नको, अशीही काहींची भूमिका आहे.
नावाबाबत उत्सुकता
प्रस्तावित तिसरा जिल्हा कोणत्या नावाने ओळखला जाईल याविषयी उत्सुकता आहे. यास 'अटल' जिल्हा असे नाव दिले गेल्याची चर्चा आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी याबाबत आज, बुधवारी माहिती देऊ असे माध्यमांना सांगितले.