राज्यात महिनाभरासाठी पुरेसा सिलिंडरसाठा : मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 09:18 IST2026-03-10T09:18:13+5:302026-03-10T09:18:58+5:30
आमदार मायकल लोबो यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला होता.

राज्यात महिनाभरासाठी पुरेसा सिलिंडरसाठा : मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : युद्धाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम आशिया आणि आखाती देशात तणावाचे वातावरण असले तरी राज्यावर त्याचा जास्त परिणाम होणार नाही, याची खबरदारी आम्ही घेत आहोत. विशेषतः एलपीजी सिलिंडर आणि इंधन पुरवठ्यावर परिणाम होणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी अधिवेशनात दिली. घरगुती व व्यावसायिक वापरासाठीचा एक महिन्याचा गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा आमच्याकडे उपलब्ध आहे, अशी माहिती सावंत यांनी दिली.
आमदार मायकल लोबो यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला होता. यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, 'राज्य सरकार एलपीजी पुरवठादार कंपन्या तसेच तेल उद्योगांशी सातत्याने संपर्कात आहे. सध्या गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा कायम ठेवला जाईल आणि त्याच्या दरात वाढ होऊ दिली जाणार नाही. आवश्यकता भासल्यास इतर देशांकडून अतिरिक्त साठा उपलब्ध करून घेण्याबाबतही चर्चा करण्याची तयारी आहे. गॅस सिलिंडरवरील वॅट कमी करण्याबाबतही सरकार विचार करेल.'
केंद्राने घेतला आढावा
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 'पश्चिम आशिया आणि आखातातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी दुपारी तीन वाजता देशभरातील सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांची आभासी बैठक झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. भारतीय दूतावासांमार्फत तेथील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक समन्वय साधला जात आहे. आंतरदेश व्यवसाय व दरवाढीवरदेखील आमचे लक्ष आहे, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले.