मंत्रिमंडळात केव्हाही बदल होऊ शकतो!; प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचे पुन्हा संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 07:12 IST2025-09-03T07:11:25+5:302025-09-03T07:12:21+5:30
पक्षशिस्त पाळण्याचे आवाहन

मंत्रिमंडळात केव्हाही बदल होऊ शकतो!; प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचे पुन्हा संकेत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : काही दिवसांपूर्वीच दिगंबर नाईक व रमेश तवडकर यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. चतुर्थीच्या दिवशीच त्यांना खातेही देण्यात आले. त्याचदिवशी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी येत्या काळात आणि बदल शक्य असल्याचे संकेत दिले होते. आता पुन्हा दामू नाईक यांनी मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तविली आहे. हा बदल केव्हाही होऊ शकतो, तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे आणि मुख्यमंत्री असे बदल केव्हाही करू शकतात, असे सांगून टाकले.
एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. केव्हा बदल होणार? असे विचारले असता ते म्हणाले की, हे बदल होण्याची शक्यता जानेवारीतही आहे आणि मार्चमध्येही आहे. यावेळी नाईक यांनी पक्षाच्या शिस्तीला तडा जाणाऱ्या काही घटना घडल्याचे मान्यही केले. त्यासाठी नवीन आमदारांना भाजपची कार्यपद्धत तितकी समजलेली नसावी. परंतु ही कार्यपद्धती आणि शिस्त सर्वांना समजून घ्यावीच लागेल. कारण बेशिस्तही खपवून घेतली जाणार नाही, असेही ते म्हणाले.
तुम्ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्हाल? असे कधी वाटले होते का या प्रश्नावर दामू नाईक म्हणाले की, २००४ मध्ये इडीसी पाटो येथे पक्षाचे मोठे अधिवेशन झाले होते. त्यावेळी मनोहर पर्रीकर यांनी मला म्हटले होते की तू कधी तरी पक्षाचा अध्यक्ष होणार. आज त्यांच्या त्या शब्दांची प्रकर्षाने आठवण होते. निष्ठेने पक्षाचे काम करत राहिलो. अनेक अडचणी आल्या, जय-पराजय पाहिले. पण पक्षाचे काम थांबवले नाही. त्यामुळेच आज प्रदेशाध्यक्ष बनू शकलो, असे नाईक यांनी सांगितले.
भाजप अल्पसंख्याकाविरोधात असल्याचा बनाव आता चालणार नाही. तसे असते तर भाजप सरकारात अल्पसंख्याक मंत्री बनलाच नसता, असे नाईक सांगतात. अॅन्टी इन्कंबन्सीचा फार बाऊ करण्याचे कारण नसल्याचे ते सांगतात. कारण या सरकारने कामे केली आहेत. सरकारला बदनाम करणारे लोक हे विविध कारस्थाने रचून ते करीत आहेत. परंतु त्याचा पक्षावर परिणाम होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दुरावलेल्यांना पुन्हा सोबत घेऊ
गेल्या काही वर्षांत काही कारणांमुळे पक्षाचे अनेक निष्ठावंत पक्षापासून दूर गेले आहेत. मी प्रदेशाध्यक्ष होताच अशा सर्व लोकांनी मला फोन करून शुभेच्छा दिल्या. दुरावलेली ही माणसे पुन्हा पक्षात आल्यास त्यांचे स्वागतच करीन. कारण ते भाजपचे कार्ययकर्ते आहेत. उत्पल पर्रीकर, दयानंद मांद्रेकर ही मंडळी पक्षापासून दूर गेलेली नाहीत, असेही नाईक म्हणाले.
मुख्यमंत्रीच पक्षाचा चेहरा
केंद्रात आपले सरकार आहे आणि राज्य सरकार नाही, ही सल होती. त्यामुळे गोव्यातही सरकार स्थापन करण्याचा निश्चय आम्ही केला होता. त्या काळात भाजपची भूमिका ज्यांना पटली ते काँग्रेसचे आमदार आमच्याबरोबर येण्यास तयार झाले आणि त्यांना घेऊन आम्ही सरकार केले. त्यावेळी ती पक्षाची गरजही होती. आमदार, मंत्री कुणीही असले तरी मुख्यमंत्री हे सरकारचा चेहरा आहेत, असे ते म्हणाले.