लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : १९४७ साली उर्वरित देशाबरोबरच गोव्याला स्वातंत्र्य मिळाले असते तर ७४ स्वातंत्र्यसैनिकांना हौतात्म्य पत्करावे लागले नसते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. गोवा मुक्तिदिनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी मुक्ती लढ्यातील १५ हुतात्म्यांच्या पहिल्या पिढीतील वारसदारांना सरकारतर्फे १० लाख रुपये व गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
मुख्यमंत्री म्हणाले की, माझ्यासाठी मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दितील हा सर्वात मोठा कार्यक्रम होय. गोव्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे शौर्य, त्याग व राष्ट्रभक्ती प्रेरणादायी आहे. कर्नल बेनिपाल सिंग यांच्या वीरपत्नीची गेल्या वर्षी हरयानात आपण भेट घेतली होती व तिला सन्मानित केले होते, असे मुख्यमंत्री म्हणाले. कार्यक्रमास गोवा स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास ऊर्फ दाद देसाई, मुख्य सचिव व्ही. कांडावेलू व इतर उपस्थित होते. स्वातंत्र्यसैनिकांची मुले मुक्तिदिनाला वगैरे उपस्थित रहात नसल्याने दाद देसाई यांनीही खेद व्यक्त केला.
मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी चौरगती प्राप्त केलेल्या हुतात्यांची पत्नी, मुले आदी पहिल्या पिढीतील कायदेशीर वारसदारांची निवड करण्यात आली. हुतात्म्यांच्या दुसया पिढीचाही सन्मानासाठी विचार करावा, अशी मागणी आलेली आहे. परंतु ती पूर्ण करता येणे शक्य नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. याआधीच्या सरकारने स्वातंत्र्यसैनिकांसाठी काहीच केले नाही. हुतात्म्यांच्या मुलांना नोकऱ्या वगैरे मिळू शकल्या नाहीत. माझ्या सरकारने धोरण करुन स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांनाही नोकऱ्या दिल्या. जे काही शिल्लक राहिले असतील त्यांनाही नोकऱ्या दिल्या जातील.
नोकऱ्या मिळालेली मुले मुक्तिदिनाला येत नाहीत
मुख्यमंत्री म्हणाले की, स्वातंत्र्यसैनिकांच्या कोट्यातून सरकारी नोकरी मिळवलेली स्वातंत्र्यसैनिकांची मुले मुक्तीदिन सोहळ्याला किंवा स्वांतत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला गैरहजर राहतात, हे पाहून खेद वाटतो. गोव्याबाहेर राहूनही हुतात्मा हिरवे गुरुजी व शेषनाथ वाडेकर यांचे कुटुंबीय गोवा मुक्तिदिनाच्या कार्यक्रमाला आवर्जून हजर राहतात, याचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी केला.
यांनी स्वीकारला सन्मान !
हुतात्मा बाळा राया मापारी यांच्यावतीने त्यांची विवाहित कन्या लक्ष्मी चंद्रकांत आगरवाडेकर यांनी सन्मान स्वीकारला. मापारी गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यातील पहिले हुतात्मा होत. तुळशीराम हिरवे (हिरवे गुरुजी) यांच्यावतीने पुत्र प्रदीप, बसवराज उदगी यांच्यावतीने पुत्र दिलीपकुमार, शेषनाथ वाडेकर यांच्यावतीने सून सरिता जयंत वाडीकर, रोहिदास मापारी यांच्यावतीने पुत्र ज्ञानेश्वर, यशवंत आगरवाडेकर यांच्यावतीने पुत्र रामदास, रामचंद्र नेवगी यांच्यावतीने पुत्र सुरेश, सुभाष व कन्या माणिक शिरोडकर, बाबू गांवस यांच्यावतीने पुत्र मनोहर व कन्येने, लक्ष्मण नारायण वेलिंगकर यांच्यावतीने पुत्र नारायण, केशव सदाशिव टेंगसे यांच्यावतीने पुत्र विनायक, परशुराम आचार्य यांच्यावतीने पुत्र अनिल यांनी सन्मान स्वीकारला.