शिवोलीत व्हिलामध्ये चोरी, १५ लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2024 17:36 IST2024-03-29T17:32:10+5:302024-03-29T17:36:03+5:30
हणजूण पोलिस स्थानकात या चोरीची तक्रार नोंदवली आहे.

शिवोलीत व्हिलामध्ये चोरी, १५ लाखांचा ऐवज लंपास
गोवा (हणजूण) : मार्ना - शिओली येथील एका व्हिलाच्या बेडरुमच्या खिडकीची जाळी कापून अज्ञात चोरांनी कपाटातील सुवर्ण अलंकार व रोख रक्कम मिळून १४ लाख ७६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. बुधवारी, दि. २८ रोजी मध्यरात्री ही चोरीची घटना घडली. याबाबत राजेश कुमार गुप्ता यांनी हणजूण पोलिस स्थानकात या चोरीची तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, राजेश कुमार यांचे पालक या घटनेदिवशी व्हिलामध्ये झोपलेले होते. त्यांना या चोरांची चाहूलही लागली नाही. सकाळी उठल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
चोरट्यांनी व्हिलाच्या पाठीमागील बाजूने पहिल्या मजल्यावर चढून एका बेडरूमच्या खिडकीची लोखंडी जाळी तोडली आणि आत प्रवेश केला. त्या खोलीतील कपाटामध्ये ठेवलेले अकरा लाख ६१ हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे दागिने आणि रोख तीन लाख पंधरा हजार रुपये चोरून नेले. राजेश कुमार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवला असून हणजूणचे पोलिस उपनिरीक्षक प्रशल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.