साखळी 'टेम्पल टाउन' बनणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 12:28 IST2025-03-30T12:28:00+5:302025-03-30T12:28:40+5:30

शिमगोत्सव मिरवणूक, शहरात घुमला घणचे कटरचा नाद

the sakhali will become a temple town said cm pramod sawant | साखळी 'टेम्पल टाउन' बनणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

साखळी 'टेम्पल टाउन' बनणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: साखळी शहराचा आज होत असलेला विकास हे सर्वांच्या योगदानाचे फलित असून, भविष्यात लोकांनी जर सहकार्य केले, तर देशातील अव्वल शहर म्हणून साखळी शहराची गणना निश्चितच होईल. साखळीत शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्य व आध्यात्मिक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. केजी ते पीजीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध आहे. येथील मंदिरांचे सौंदर्गीकरण व पर्यटनदृष्ट्या झालेला विकास पाहता, या शहराला 'टेम्पल टाउन' असेही नाव पुढे प्रचलित होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. साखळी येथे शिमगोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

साखळी शिमगोत्सव समिती आणि गोवा राज्य पर्यटन खात्यातर्फे आयोजित शिमगोत्सव मिरवणुकीची सुरुवात मुख्यमंत्री सावंत यांनी ढोलावर काठी मारून केली. यावेळी व्यासपीठावर साखळीच्या नगराध्यक्षा सिद्धी प्रभू पोरोब, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, नगरसेवक तथा शिमगोत्सव समितीचे कार्याध्यक्ष दयानंद बोर्येकर, पद्मिनी फाउंडेशनच्या अध्यक्षा सुलक्षणा सावंत, रुद्र घोडगे आणि नगरसेवक, सरपंच उपस्थित होते.

शिमगोत्सव हा सर्व धर्मीयांना एकत्रित आणणारा सण असून सर्वांमध्ये सौख्य आणण्याचे सामर्थ्य या शिमगोत्सवात आहे. या सोहळ्याला गोवा सरकारही भरघोस मदत करत असल्याने ही आमची कला व संस्कृती पाहण्यासाठी बाहेरील पर्यटकही गोव्यात येऊ लागले आहेत, असे रुद्र घोडगे म्हणाले.

यावेळी बोलताना सुलक्षणा सावंत म्हणाल्या की, शिमगोत्सवात गोव्याची विविध रूपे पाहावयास मिळतात. त्याला राज्य सरकारही सहकार्य करत आहे. त्यामुळेच येथील कला व संस्कृती जगासमोर येण्यास मदत होते. नगराध्यक्षा सिद्धी प्रभू पोरोब यांनी स्वागत केले. अनिल वेर्णेकर यांनी सूत्रसंचालन केले. या औपचारिक कार्यक्रमानंतर साखळी शहरात शिमगोत्सव मिरवणुकीला प्रारंभ झाला.

...तर रस्ता रुंदीकरण

साखळी शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. शहरातील रस्ते हे रुंद व्हावेत यासाठी सध्या सरकारकडून काम सुरू आहे. या कामी जर लोकांनी सहकार्य केले, तर पुढील शिमगोत्सवापूर्वी साखळीचे सर्व रस्ते रुंद व त्यांचे सौंदर्गीकरण पाहायला मिळेल. शहराचा दर्जा वाढवण्यासाठी आवश्यक त्या सुविधा देण्याचे कार्य करीत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
 

Web Title: the sakhali will become a temple town said cm pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.