प्रजा हीच राजा, आम्ही सेवक, मी कायम लोकांसोबतच असेन: मंत्री विश्वजीत राणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 08:15 IST2025-10-15T08:13:58+5:302025-10-15T08:15:12+5:30
गुळेलीवासीयांशी साधला संवाद

प्रजा हीच राजा, आम्ही सेवक, मी कायम लोकांसोबतच असेन: मंत्री विश्वजीत राणे
लोकमत न्यूज नेटवर्क, वाळपई : प्रजा हीच राजा असून आम्ही सेवक आहोत. जनतेच्या जीवनात चांगला बदल घडवून आणणे हे भाजप सरकारचे ध्येय आहे. मी कायम लोकांसोबत राहीन. सत्तरी व उसगावच्या जनतेची साथ देणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे, असे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे म्हणाले.
काल, मंगळवारी सत्तरी तालुक्यातील पाटवळ खोतोडे. उड्डीवाडा -उसगाव, तसेच गुळेली येथे कार्यक्रम झाले. केंद्र सरकारने अकरा वर्षांत देशात ज्या चांगल्या गोष्टी केल्या, त्याची माहिती मंत्री राणे यांनी यावेळी दिली. सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन व्हायला हवे हा मोदी सरकारचा विचार आहे. तो विचार अंमलात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच विचारधारा आम्ही पुढे नेत आहोत. लोकांना रोजगार संधी मिळेल. सत्तरी व उसगावमधील जनतेला व एकूणच युवा वर्गालाही रोजगार संधी प्राप्त होईल, असेही मंत्री विश्वजीत राणे म्हणाले.
गुळेली येथील जनतेसोबत मी कायम राहीन. जनतेचे सेवक बनून आम्ही काम करत आहोत. केंद्रात भाजपचे सरकार आहे व गोव्यातही भाजपचेच सरकार कायम राहिल. विरोधकांच्या अपप्रचाराकडे कुणी लक्ष देऊ नये. विरोधक विकास कामांना विरोध करतात. ते कधी सत्तेवर येऊ शकत नाहीत असे मंत्री राणे म्हणाले. सत्तरीचा विकास जोरात सुरू असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचेही त्यासाठी चांगले सहकार्य लाभत आहे, असेही मंत्री विश्वजीत राणे म्हणाले.