गोव्यात संघाकडून नीतीमूल्यांना हरताळ! प्रा. सुभाष वेलिंगकर वेलिंगकर यांची कडक टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 08:57 AM2023-04-03T08:57:43+5:302023-04-03T08:58:19+5:30

प्रा. वेलिंगकर यांच्या 'लोटांगण' या पुस्तकाचे रविवारी पणजीतील इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा सभागृहात प्रकाशन झाले.

the moral values were defeated by rss in goa subhash velingkar strong criticism | गोव्यात संघाकडून नीतीमूल्यांना हरताळ! प्रा. सुभाष वेलिंगकर वेलिंगकर यांची कडक टीका

गोव्यात संघाकडून नीतीमूल्यांना हरताळ! प्रा. सुभाष वेलिंगकर वेलिंगकर यांची कडक टीका

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : माध्यम धोरणावर भाजप सरकारने घूमजाव केल्यानंतर गोव्यात संघ म्हणून राहायचे तर त्यांना सरकारपुढे लोटांगण घालत राहावे लागले असते. त्यामुळेच गोव्यातील ९५ टक्के स्वयंसेवकांनी संघ सोडला. इथे संघाने नीतीमूल्यांना हरताळ फासल्याची टीका गोव्याचे माजी संघप्रमुख प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी त्यांच्या 'लोटांगण' या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात केली.

प्रा. वेलिंगकर यांच्या 'लोटांगण' या पुस्तकाचे रविवारी पणजीतील इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा सभागृहात प्रकाशन झाले. प्रा. माधव कामत, वरिष्ठ पत्रकार गुरुदास सावळ आणि राष्ट्रीय बजरंगदलचे प्रमुख नितीन फळदेसाई यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

पुस्तक का लिहावे लागले, हे सांगताना प्रा. वेलिंगकर म्हणाले, गोव्यात भाजपने मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण या मूलभूत तत्त्वाशी फारकत घेतल्यानंतर केंद्रीय संघाने त्याला मूकसंमती दिली. इतकेच नव्हे, तर त्याविरुद्ध आंदोलन करू नका, यासाठी गोव्यातील स्वयंसेवकांवर दबाव टाकला. या दबावाला बळी पडून संघात राहिलो असतो, तर भाजपसमोर लोटांगण घालीत राहावे लागले असते, जे आम्हाला मंजूर नव्हते. ज्येष्ठ संघ प्रचारक दुर्गादास नाडकर्णी यांच्या तालमीतील स्वयंसेवकांनी तत्त्वांशी प्रतारणा न करता संघ सोडला. स्वयंसेवकांच्या या त्यागाचे विस्मरण भविष्यात होऊ नये आणि अपप्रचाराला बळी पडू नये, यासाठी हे पुस्तक लिहिल्याचे प्रा. वेलिंगकर यांनी सांगितले.

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. माधव कामत म्हणाले, गोमंतकातील प्रभावी व्यक्तिमत्त्व, विचारवंत प्रा. सुभाष वेलिंगकर यांचे 'लोटांगण' हे पुस्तक म्हणजे एका प्रकारचा ग्रंथच. पुढच्या पिढीसाठी हे पुस्तक खूप महत्त्वाचे ठरणार आहे. ज्या चुका आता झाल्या, त्या कशा सुधारता येतील किंवा भविष्यात कोणत्या चुका करू नयेत, याचे सार या पुस्तकात आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य हे त्यांच्या नसानसांत आहे. संघासाठी पत्रकारिता, नोकरीचा त्याग करणारे वेलिंगकर मी पाहिले आहेत. गेली ६० वर्षे त्यांनी संघाचे काम अफाटरीत्या गोव्यात केले आहे. यातून संघ गोव्यात बहरला आणि अनेक दर्जेदार राजकीय नेते तयार झाले, पण दुर्दैवाने आज हेच लोक वेलिंगकरांबाबत अपप्रचार करत आहेत. या सर्व अपप्रचारांना प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी लोटांगणाच्या माध्यमातून उत्तर दिले आहे, असे गुरुदास सावळ यांनी सांगितले.

'लोकमत'चे मानले आभार

प्रा. वेलिंगकर यांनी सांगितले की, सुरुवातीच्या काळात मातृभाषेसाठी लढा पुकारलेल्या स्वयंसेवकांची भूमिका मांडणारे लिखाण दैनिक 'लोकमत'ने केले. जवळजवळ एक वर्ष 'लोकमत याबाबत सातत्याने लिखाण करत होते. त्यामुळे 'लोकमत'चे आभार त्यांनी कार्यक्रमात मानले, 'लोटांगण' पुस्तक प्रकाशित होऊ नये आणि या प्रकाशनाला प्रसिद्धी माध्यमांनी प्रसिद्धी देऊ नये, यासाठीही दबावतंत्राचा वापर झाल्याचा आरोपही प्रा. वेलिंगकर यांनी केला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: the moral values were defeated by rss in goa subhash velingkar strong criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.