महापौर म्हणाले, कॅसिनोला पाठिंबा नाही, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 12:21 IST2026-02-10T12:20:12+5:302026-02-10T12:21:02+5:30
'पणजीकार अगेन्स्ट कॅसिनो'चा मांडवीत नव्या कॅसिनोला विरोध

महापौर म्हणाले, कॅसिनोला पाठिंबा नाही, पण...
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'माझा वैयक्तिकरीत्या कॅसिनोला पाठिंबा नाही. मात्र, शहरातील कॅसिनो अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात योगदान देत असल्यामुळेच लोक त्यांना सहन करत आहेत' असे महापौर रोहित मोन्सेरात यांनी सांगितले.
मांडवी नदीत प्रस्तावित असलेल्या नवीन रिव्हर कॅसिनोला विरोध दर्शविण्यासाठी सोमवारी 'पणजीकार अगेन्स्ट कॅसिनो' या संघटनेच्या बॅनरखाली एकत्र आलेल्या नागरिकांच्या शिष्टमंडळाने पणजी महानगरपालिकेचे महापौर रोहित मोन्सेरात व आयुक्तांची भेट घेतली. नागरिकांनी लेखी निवेदन देऊन नदीत नवीन कॅसिनो उभारण्याच्या प्रस्तावाला तीव्र विरोध नोंदविला. यावेळी मोन्सेरात यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
आपचे प्रदेशाध्यक्ष वाल्मीकी नायक यांसह इतर नागरिक उपस्थित होते. दरम्यान, महापौरांनी निवेदन स्वीकारून, येत्या गुरुवारी, दि. १२ रोजी सकाळी ११ वा. या विषयी बैठक बोलाविण्याचे ठरविले आहे.
नागरिकांनी निवेदनात म्हटले आहे की, मांडवी नदी आधीच कॅसिनोंमुळे प्रदूषित होत आहे. कॅसिनोंमुळे वाहतूककोंडी, पर्यावरणीय हानी आणि सामाजिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत आणखी एक नवीन रिव्हर कॅसिनो सुरू झाल्यास शहराच्या पर्यावरण, आरोग्य आणि सार्वजनिक सुरक्षेवर गंभीर परिणाम होतील. शिष्टमंडळाने महापौरांना महापालिकेच्या आगामी बैठकीत प्रस्तावित कॅसिनोविरोधात ठराव मंजूर करण्याची मागणी केली.
पणजीची ओळख धोक्यात : वाल्मिकी नायक
यावेळी 'आप'चे वाल्मिकी नायक म्हणाले की, पणजी हे सांस्कृतिक व ऐतिहासिक शहर असून पर्यटनाचा विकास हा पर्यावरणपूरक, शाश्वत पद्धतीने व्हायला हवा. कॅसिनो संस्कृतीमुळे शहराची ओळख थोक्यात येत असून स्थानिक नागरिकांचे जीवनमान बिघडत आहे. गेली अनेक वर्षे पणजीकर कॅसिनोचे प्रदूषण सहन करत आहे. आता नवीन येऊ घातलेला कॅसिनो हा ११२ मीटर लांब व २७ मीटर उंच आहे. एका इमारतीप्रमाणे असलेला हा कॅसिनो मांडवीतील प्रदूषण वाढवेल.
मांडवीतील कॅसिनो परवाने सरकारकडून : मोन्सेरात
महापौर म्हणाले की, 'कोणत्याही कॅसिनोला परवाना देण्याचा अधिकार महानगरपालिकेकडे नाहीत. मनपा फक्त जमिनीवर असलेल्या कॅसिनोच्या कार्यालयांना (ऑफिसेस) व्यापार परवाना देते. मांडवी नदीतील रिव्हर कॅसिनोंना परवाने देण्याबाबत मनपाचा कोणताही संबंध नाही. हे अधिकार राज्याच्या गृह खाते, नदी परिवहन (रिव्हर नेव्हिगेशन) खाते तसेच कॅप्टन ऑफ पोर्ट्स खात्याकडे आहेत.' मोन्सेरात म्हणाले की, 'शहरात कॅसिनोंमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या सोडवण्याची जबाबदारी सरकारची आहे. कॅसिनोंशी संबंधित वाहतूक, सामाजिक व अन्य प्रश्नांवर सरकारने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे' असेही त्यांनी नमूद केले.