'भाजप-आप'मधील संघर्ष गंभीर होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 11:48 IST2025-09-23T11:47:51+5:302025-09-23T11:48:57+5:30
आमदार वेंझी सरकारकडून टार्गेट होण्याची शक्यता : कायदेशीर कारवाई करण्याचा भाजपचा इशारा

'भाजप-आप'मधील संघर्ष गंभीर होणार
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भारतीय जनता पक्ष विरुद्ध आम आदमी पक्ष असा संघर्ष आगामी काळात वाढणार असल्याची माहिती काल मिळाली. रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ल्याचा विषय राहिला बाजूला. पण आता 'आप'चे आमदार वेंझी व्हिएगश यांच्याविरोधात अगोदर पोलिस तक्रार नोंदवून घ्यावी व मग त्यांना पोलिसांकरवी तांत्रिक तरी अटक करून घ्यावी, अशी खेळी सरकारी यंत्रणा खेळू शकते. तशा जोरात हालचाली सुरू झाल्या आहेत.
वेंझी हे मोर्चावेळी थेट भाजपच्या पणजी कार्यालयात गेले होते. त्यावेळी वेंझी आक्रमक होते व भाजपवर कार्यालयाची दारे बंद करण्याची वेळ इतिहासात प्रथमच आली. राज्यभर भाजप कार्यकर्त्याच्या मनोधैर्यावर परिणाम होऊ नये, म्हणून वेंझी यांना तांत्रिक झाली तरी अटक दाखवून दिल्लीपर्यत (म्हणजे केजरीवाल पर्यंत) कडक संदेश पाठविण्याचे ठरू लागले आहे. येत्या दोन दिवसांत काहीही घडू शकते. पण आम आदमी पक्षदेखील फायटर पद्धतीने हा विषय हाताळू पाहत असल्याचे समजते.
कायदेशीर कारवाईचा भाजपचा इशारा
रामा काणकोणकर यांना झालेल्या मारहाण प्रकरणानंतरच्या आंदोलनादरम्यान भाजप कार्यालयावर धडक देणारे आम आदमी पक्षाचे आमदार वेंझी व्हिएगस तसेच इतरांविरोधात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. आपण तशी सूचना भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांना केली असल्याची माहिती राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे यांनी दिली.
ते म्हणाले की, 'काणकोणकर यांच्यावर करण्यात आलेला हल्ला अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकारानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आदेश दिल्यानंतर संशयितांना तातडीने अटक होऊ शकली. तसेच या प्रकरणात कोणाचीच गय केली जाणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. पण पणजीत काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान भाजपच्या प्रदेश कार्यालयात आमदारांसह इतरांनी प्रवेश केला केला. हा प्रकार चुकीचा आहे.
भाजपनेही अनेकवेळा राजकीय आंदोलने केली. इतर राजकीय पक्षांच्या कार्यालयाच्या परिसरात आंदोलने केली. पण कार्यालयात कधीच घुसखोरी केली नाही. कदाचित राजकारणात प्रथमच निवडून आलेल्या व्हिएगस यांना हे माहीत नसावे.
ही तर गोमंतकीयांना धमकी: अमित पालेकर
भाजप कार्यालयात जमाव घेऊन प्रवेश केल्याबद्दल तीन दिवसांत माफी मागावी, अशी धमकी भाजपने आमदार वेन्झी व्हिएगस यांना दिली आहे. ही धमकी वेन्झी यांना नव्हे तर गोमंतकीयांना असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे नेते अॅड. अमित पालेकर यांनी केला. या प्रकरणात आप माफी मागणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
आमदारांच्या सहभागाने मडगावात मोठा मोर्चा
रामा काणकोणकर मारहाण प्रकरणातील मास्टरमाइंडला अजून अटक झालेली नाही. त्याचे नाव सर्वांसमोर यायला हवे. काणकोणकर यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही गोवा बंद करू, असा इशारा आपचे आमदार वेंझी व्हिएगस यांनी दिला. मडगाव येथे संशयितांवर कारवाईसाठी मोर्चा काढण्यात आला. आज जर आम्ही यांच्या धमक्यांना भिऊन गप्प बसलो, तर उद्या हे आम्हाला घरात येऊन मारतील. मोर्चा काढू नये आणि मी माफी मागावी यासाठी तीन दिवसांची नोटीस दिली. हे घाबरविण्याचे तंत्र आहे असे ते म्हणाले. यावेळी वाल्मिकी नायक, संदेश तेलेकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
तीन दिवसांत माफी मागा : भाजप
रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ल्याविरोधात आयोजित आंदोलनावेळी आमदार कॅप्टन वेन्झी व्हिएगस यांनी भाजप कार्यालयात जमाव घेऊन प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार चुकीचा असून, वेन्झी यांनी तीन दिवसांत माफी मागावी, आमचा संयम पाहू नये, असा इशारा आमदार दाजी साळकर यांनी दिला. पणजी येथे काल आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, भाजयुमोचे अध्यक्ष तुषार केळकर, प्रभाकर गावकर उपस्थित होते.