शिक्षकांना मिळणार दीर्घ वैद्यकीय रजा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 15:59 IST2025-04-30T15:59:06+5:302025-04-30T15:59:56+5:30
मडगावात उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेतर्फे 'कलागुरुजन' महोत्सव

शिक्षकांना मिळणार दीर्घ वैद्यकीय रजा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : गंभीर आजारावर उपचासाठी शिक्षकांना दीर्घकाळासाठी वैद्यकीय रजा मिळणार आहे. शिक्षकांची विनंती विचारात घेऊन त्याविषयीचा आदेश शिक्षण संचालक जारी करतील. वेतन श्रेणीसंदर्भात अर्थ खात्याशी चर्चा केली जाईल. शिक्षकांनी सातत्याने शिकणे गरजेचे आहे. जो शिकत नाही, तो शिक्षक असूच शकत नाही. शिक्षकांनी सातत्याने तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण कल्पना शिकण्याची गरज आहे, असे मत मुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.
गोवा उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेतर्फे (हिस्टंग) शिक्षकांसाठी 'कलागुरुजन' हा शैक्षणिक आणि सांस्कृतिक महोत्सव मंगळवारी रवींद्र भवनमध्ये झाला. या महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर, संघटनेचे अध्यक्ष बाबाजी सावंत, शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अध्यक्ष भगीरथ शेट्ये, गोविंद पर्वतकर, रवींद्र भवनचे उपाध्यक्ष मनोहर बोरकर आदी उपस्थित होते.
सर्वांत मोठा समुपदेशक जर कोण होऊ शकतो, तर तो शिक्षक आहे. विद्यार्थ्यांवर सर्वांत जास्त प्रभाव कोणाचा असेल तर तो शिक्षकाचा असतो. आई-वडिलांनी सांगितलेले एक वेळ मुले ऐकणार नाहीत, पण शिक्षकांनी सांगितले तर ते ऐकतील. म्हणून विद्यार्थ्यांशी व्यक्तिशः संवाद साधणे ही काळाची गरज आहे. कितीही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आले, तरी जोपर्यंत शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात नाते तयार होत नाहीत, तोपर्यंत मुले घडू शकत नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले. गोव्याचे भविष्य ठरविणे हे शिक्षकांच्या हातात आहे. त्यामुळे शिक्षकांनी नेहमीच अपडेट राहण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
प्रसाद लोलयेकर यांनी सांगितले, पुढील वर्षापासून उच्च माध्यमिक स्तरावर एनईपीची अंमलबजावणी केली जाईल. एनईपीचे जास्त लक्ष हे दर्जात्मक शिक्षणावर आहे. यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला गुणवंत शिक्षक लागेल.
पायाभूत सुविधा व इतर गोष्टी या दुय्यम आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षकाचा दर्जा वाढवावा लागेल. जसा काळ बदलतो, तसे तंत्रज्ञान बदलते. पुढे आणखी प्रगती होईल. एआय येईल, पण एआय शिक्षकांची जागा घेऊ शकत नाही. शिक्षकांना सतत स्वतःला अपग्रेड करावे लागणार आहे. तेव्हाच आम्ही मुलांना दर्जात्मक शिक्षण देऊ शकू.
फ्युचरिस्टिक एज्युकेशनवर विचार करण्याची गरज
मुख्यमंत्री म्हणाले की, विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्याच्या दृष्टीने शिक्षकांना राज्यात कोणते अभ्यासक्रम उपलब्ध आहेत आणि कोणत्या अभ्यासक्रमांना मागणी आहे, याविषयी माहिती असणे गरजेचे आहे. गोवा हे पर्यटन राज्य असल्याने आयटीआयमध्ये हॉस्पिटॅलिटी कोर्स सुरू करण्यात आला आहे. अप्रेंटिसशिप संकल्पना सुरू करण्यात आली आहे. भविष्य लक्षात घेऊन शिक्षण देण्याचा विचार होणे आवश्यक आहे. म्हणूनच शिक्षकांनी या फ्युचरिस्टिक एज्युकेशनचा विचार करावा.