बांबोळी अपघातप्रवण ठिकाणी उपाययोजना करा; मुख्यमंत्र्यांचे करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 07:39 IST2025-11-07T07:38:56+5:302025-11-07T07:39:23+5:30
मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

बांबोळी अपघातप्रवण ठिकाणी उपाययोजना करा; मुख्यमंत्र्यांचे करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : बांबोळी येथे अपघातप्रवण क्षेत्रात आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी वाहतूक पोलिस अधीक्षक तसेच बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मंगळवारी पहाटे भरधाव वेगातील एका टँकरने दुभाजक तोडून कारला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात भारतीय सॅपेक टॅकरो असोसिएशनचे अध्यक्ष योगेंद्रसिंह दहिया व प्रशिक्षक असे दोघे जागीच ठार झाले होते. बुधवारी मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
पत्रकारांनी या भेटीसंबंधी विचारले असता मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'बांबोळी येथे महामार्गावर याच पट्टयात अलीकडे अनेक अपघात झालेले आहेत. त्यामुळे पाहणी करण्यासाठी मी गेलो होतो. वाहतूक पोलिस अधीक्षक तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारीही माझ्यासोबत होते. तेथे बॅरिकेड्स वगैरे टाकावे लागतील तसेच रोड इंजिनिअरिंगच्या बाबतीतही अभ्यास करून आवश्यक त्या सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत.'