विकसित गोवा साकारण्यासाठी पुढाकार घ्या; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 08:24 IST2025-11-10T08:23:22+5:302025-11-10T08:24:52+5:30
विर्कोडा येथे सहकार भारती गोवाच्या आठव्या अधिवेशनाचे उद्घाटन, मान्यवरांचा सत्कार

विकसित गोवा साकारण्यासाठी पुढाकार घ्या; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारत आणि विकसित गोवा २०३७ स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी सहकार भारतीने सहकाराच्या माध्यमातून प्रयत्न करावेत. त्यासाठी गोव्याच्या सहकारक्षेत्रात युवक आणि महिला कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये समावेश करावा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
विनोंडा येथील संत सोहिरोबानाथ आंबिये शासकीय कला व वाणिज्य महाविद्यालय सभागृहात आयोजित केलेल्या सहकार भारती गोवाच्या आठव्या अधिवेशनाचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, गोवा राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष पांडुरंग कुट्टीकर, पेडणे पालिकेच्या नगराध्यक्ष अश्विनी पालयेकर, सहकार भारतीचे राष्ट्रीय मंत्री दिलीप पाटील, सहकार भारती गोवाचे अध्यक्ष अशोक गावडे, सचिव रघुवीर वस्त, अधिवेशन प्रमुख श्रीपाद परब आदी उपस्थित होते.
गोवा राज्य सहकारी संघामार्फत कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणे, एक खिडकी योजना राबवून सर्व सहकारी संस्थांना एका छताखाली आणणे इत्यादी कामे येणाऱ्या काळात आम्हाला करायची आहेत. सहकार क्षेत्राच्या मुख्य प्रवाहात युवक आणि महिला यांना सामील करून घेतल्यास आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
देशभरामध्ये सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारी सहकार भारती आज गोव्यामध्ये प्रामुख्याने सहकार क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी कार्यरत आहे. सहकारातून समृद्धी घडवण्यात सज्ज आहे. सहकारातून देशाच्या विकासाचे स्वप्न दृष्टिपथात येणे शक्य आहे.
गोव्याच्या सहकारक्षेत्रात विश्वसनीय कामगिरी करून लोकांचा विश्वास संपादन करणे काळाची गरज आहे. त्यासाठी सहकारी संस्थांनी लोकाभिमुख कार्यक्रम आखावेत. गोव्याच्या सहकार क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी सहकार खाते प्रयत्नशील आहेच, त्याला सहकार कार्यकर्त्यांच्या सहकाराची गरज आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सहकार क्षेत्रात असलेल्या पळवाटा बंद करून सहकाराला नवी दिशा देण्यासाठी सहकार भारतीने पुढाकार घ्यायला हवा. गोव्याच्या सहकाराचा सर्वसामान्य जनतेला कसा फायदा होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. गोव्यात सहकाराला भरपूर वाव आहे. मात्र, त्यासाठी संघटित कार्यकर्त्याची गरज आहे. सरकारचे आवश्यक सहकार्य त्याची मिळेल, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे म्हणाले की, आज गोव्यात सहकार भारतीच्या माध्यमातून सहकार कार्यकर्ते संघटित होत आहेत ही समाधानाची गोष्ट आहे. सहकार क्षेत्रात निस्वार्थीपणे कार्य केल्यास संस्थांची प्रगती निश्चितच होते.
गोव्यातील सहकार कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून सहकार क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी सज्ज व्हायला हवे. विकसित भारत खऱ्या अर्थाने व्हायचा असेल, तर सहकार क्षेत्राला पर्याय नाही. सहकार क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती ही शक्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सहकार हा देशाचा आत्मा
सहकार हा देशाचा आत्मा आहे. सहकाराच्या माध्यमातून देशाची सर्वांगीण प्रगती शक्य आहे. त्यासाठी समर्पित भावनेने कार्य करणारे संस्कारी कार्यकर्ते सहकारक्षेत्रात तयार झाले पाहिजे. त्यासाठी देशभरात प्रयत्नशील असलेल्या सहकार भारतीचे जाळे गावागावात पसरण्याची गरज आहे. सहकारक्षेत्रातूनच ग्राम विकास शक्य आहे. म्हणूनच केंद्र सरकारने स्वतंत्र सहकार मंत्रालय सुरू केल्याचे राष्ट्रीय मंत्री दिलीप पाटील यांनी सांगितले.