विकासकामांसाठी कुंभारजुवे आमदारांना पाठिंबा: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 13:04 IST2025-09-20T13:03:18+5:302025-09-20T13:04:05+5:30
आमदार राजेश फळदेसाई यांच्या वाढदिवशी विविध उपक्रम; श्रीपाद नाईक यांची उपस्थिती

विकासकामांसाठी कुंभारजुवे आमदारांना पाठिंबा: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोवा पुनर्वसन मंडळाचे अध्यक्ष व कुंभारजुवा आमदार राजेश फळदेसाई यांना विकासकामे राबवण्यासाठी राज्य सरकार तसेच भाजपचा पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
आमदार फळदेसाई यांच्या वाढदिवस समारंभात मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. या प्रसंगी पर्यटन मंत्री रोहन खवंटे, परिवहन मंत्री माविन गुदिन्हो, केंद्रीय मंत्री व उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, केपेचे माजी आमदार चंद्रकांत कवळेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर (दामू) नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तनावडे, वास्को आमदार कृष्णा (दाजी) साळकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, कला व संस्कृती मंत्री रमेश तवडकर, समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, सांताक्रूझचे आमदार रुदोल्फ फर्नाडिस, माजी आमदार नरेश सावळ, फ्रान्सिस्को सिल्वेरा, माजी खासदार विनय तेंडुलकर आदी मान्यवर उपस्थित होते. शुभेच्छुक, नातेवाईक व मित्र परिवार फळदेसाई यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने जमले होते.
आमदार फळदेसाई म्हणाले, मतदारसंघात आम्ही अनेक विकासकामे केली आहेत. मुख्यमंत्री आम्हाला पाठिंबा देतात. त्यांनी धावजी येथे ४० कोटी रु.चा उड्डाणपूलही मंजूर केला आहे, जो पुढील वर्षी जानेवारीपर्यंत तयार होण्याची शक्यता आहे.
विकसित गोव्यासाठी साथ द्या
'फळदेसाई हे २४ तास लोकांसाठी काम करतात. मी त्यांना खात्री देतो की सरकार व पक्ष त्यांच्यासोबत आहेत आणि पुढेही त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी साथ देणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'विकसित भारत २०४७' ही दृष्टी ठेवली आहे. ही दृष्टी साकारण्यासाठी तसेच 'विकसित गोवा २०४७'च्या उद्दिष्टासाठी आम्ही आपल्याला दुहेरी इंजिन सरकारला मत द्यावे, असे आवाहन करतो, असे ते म्हणाले.
फळदेसाई दृढनिश्चयी
प्रकल्प मिळवण्यात फळदेसाई दृढनिश्चयी आहेत. त्यांचा काम करण्यातील निर्धार सर्वांना दिसतो. ते कामे लवकर पूर्ण व्हावीत यासाठी धडपड करतात. पायाभूत सुविधा विकासाबरोबरच मानवी विकासावर लक्ष केंद्रित करून ते सर्व योजनांचा व लाभांचा फायदा लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. तसेच पंतप्रधान व मुख्यमंत्री यांचा संदेशही मतदारांपर्यंत पोहोचवतात, असे मंत्री रोहन खंवटे म्हणाले.
असे लोक दुर्मिळ
मंत्री गुदिन्हो म्हणाले, 'कुंभारजुवे मतदारसंघातील मतदारांनी चांगला माणूस आमदार म्हणून निवडून दिला, हे फार महत्त्वाचे आहे. त्यांची स्वच्छ प्रतिमा आहे व ते खूप मदत करणारे आहेत. सामान्य माणसांबद्दल कळकळ व मदतीची तयारी असावी लागते. आजच्या काळात असे लोक दुर्मिळ झाले आहेत. मतदारसंघातील विकासकामांसाठी त्यांची तत्परता दिसून येत असल्याचे मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले. तसेच त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.