पलायनाचा प्रयत्न सुलेमानच्या अंगलट; स्वतः समोर उभे केले कायद्याच्या अडचणींचे डोंगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2024 07:53 IST2024-12-25T07:51:49+5:302024-12-25T07:53:02+5:30
सुलेमान खान याच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणात आम आदमी पार्टीचे गोवा निमंत्रक अॅड. अमित पालेकर यांची मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी जुने गोवे पोलिसांनी दोन तास चौकशी केली.

पलायनाचा प्रयत्न सुलेमानच्या अंगलट; स्वतः समोर उभे केले कायद्याच्या अडचणींचे डोंगर
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भू-बळकाव प्रकरणातील अट्टल गुन्हेगार सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान गुन्हे शाखेच्या कोडठीतून पळून गेला. परंतु, नऊ दिवसांत पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. मात्र, या पलायन प्रकरणाने सुलेमानने स्वतः समोरील अडचणी वाढवल्या असून आता त्याला जामीन मिळणे अवघड आहे.
सुलेमान असा 'सराईत' आहे, ज्याच्यावर देशभर 'गुन्हे' नोंद आहेत. विविध ठिकाणी जवळपास पंधराहून अधिक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. यात गोव्यासह दिल्ली, पुणे, हैदराबादचा समावेश आहे. काही बाबतीत खटलेही चालू आहेत. त्यामुळे जिथे जाईल तिथे त्याला कोणत्या राज्यातील पोलिस कधी पकडतील याचा काही भरंवसा नसतो.
गोव्यात म्हापसा पोलिस स्थानकात त्याच्याविरुद्ध भू- बळकाव प्रकरणात गुन्हे नोंदविण्यात आल्यामुळे एसआयटी त्याच्या शोधात होती. त्यापूर्वी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हाही त्याच्यावर हणजूण पोलिसांनी नोंदविला आहे. त्यामुळे तो फरार राहिला होता. मोठ्या कष्टाने हुबळी येथे त्याला एसआयटीकडून अटक करण्यात आली होती.
वास्तविक सुलेमान हा तसा लेचापेचा गडी नसून त्याने आपल्या नावावर करून घेतलेल्या जमिनींच्या बाबतीत वाद असला तरी म्हापसा येथील एका मालमत्तेच्या बाबतीत न्यायालयात जाऊन टायटल जिंकण्यात त्याने यशही मिळविले होते. त्यामुळे त्या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा नोंद झाला तरी त्याला फारशी पर्वा नव्हती. परंतु त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याची बाजू कमकुवत पडण्याची शक्यता आहे. कारण त्याने धमकी देऊन आणि कागदपत्रात फेरफार करून जमीन हडप केल्याचा गुन्हा म्हापसा पोलिसांनी नोंदविला आहे. यात त्याचे पळून जाण्याचा प्रयत्न करणे त्याला खोटे सिद्ध करण्यासाठी पोलिसांना फायद्याचे ठरू शकते.
...म्हणून पळाला सुलेमान
सुलेमान हा जमिनी बळकावण्याच्या बाबतीत तज्ज्ञ गुन्हेगार असून गोव्याबाहेरही विविध मोंडस ऑपरेंडी वापरून त्याने जमिनी बळकावण्याचे प्रकार केले आहेत. हे प्रकार निस्तरण्यासाठी त्याला तुरुंगातून बाहेर पडणे आवश्यक होते. परंतु खून प्रकरणात आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणात त्याच्यावर गुन्हे नोंदविण्यात आल्यामुळे दीड वर्षे तरी त्याला जामीन मिळणार नाही हे लक्षात आल्यामुळे त्याने तुरूंगातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याची कबुली त्याने आपल्या व्हायरल व्हिडिओतही दिली आहे.
पालेकरांची दोन तास चौकशी
सुलेमान खान याच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणात आम आदमी पार्टीचे गोवा निमंत्रक अॅड. अमित पालेकर यांची मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी जुने गोवे पोलिसांनी दोन तास चौकशी केली. पालेकर यांची सोमवारीही दिवसभर चौकशी करण्यात आली होती. तसेच मंगळवारी सकाळी ११:०० वाजता त्यांना पुन्हा बोलावण्यात आले होते. त्यानुसार ते ११:३० वाजता पोलिस स्थानकात पोहोचले. चौकशीनंतर दीड वाजता ते परतले.
सुलेमान खान याच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणात चौकशी करण्यासाठी त्यांना भारतीय न्याय संहिता कलम १७६ अंतर्गत नोटीस बजावून बोलावण्यात आले होते. या प्रकरणातील ते एक साक्षीदार म्हणून त्यांना बोलावण्यात आले होते. मात्र, आपल्याला जी माहिती द्यायची होती ती दिल्यानंतरही सोमवारी दिवसभर पोलिस स्थानकात ठेवून घेण्यात आले आणि मंगळवारी पुन्हा बोलावण्यात आले, ही केवळ सतावणूक असल्याचे पालेकर यांनी म्हटले आहे.
सुलेमान तुमच्या कोठडीतून सुटतो आणि जी माणसे त्यासाठी जबाबदार आहेत, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याऐवजी यासंदर्भात आपण माहिती दिली म्हणून आपल्यावर राग काढला जात आहे, असेही पालेकर यांनी म्हटले आहे.
सोमवारी पालेकर पोलिस स्थानकात चौकशीसाठी गेले होते तेव्हा आम आदमी पार्टीसह विरोधी आघाडीतील सर्व नेते कार्यकर्ते त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते. मंगळवारी मात्र आपचे काही कार्यकर्ते व नेते उपस्थित होते. यावेळी आपच्या नेत्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जोरदार टीका केली.