कुख्यात सुलेमान खानला पत्नीसह केरळमधून अटक; १६ बँक पासबुक, १८ मोबाईल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2024 08:25 IST2024-12-24T08:24:46+5:302024-12-24T08:25:30+5:30
नऊ दिवसांत मुसक्या आवळल्या

कुख्यात सुलेमान खानला पत्नीसह केरळमधून अटक; १६ बँक पासबुक, १८ मोबाईल जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गुन्हे शाखेच्या पोलिस कोठडीतून दि. १३ रोजी मध्यरात्री २.३० च्या सुमारास फरार झालेला भू- बळकाव प्रकरणातील अट्टल गुन्हेगार सुलेमान खानच्या मुसक्या आवळण्यात जुने गोवे पोलिसांना यश आले आहे. केरळमध्ये एर्नाकुलम येथील त्याच्या घरात जाऊन त्याला पत्नीसह अटक करून सोमवारी गोव्यात आणले आहे.
सुलेमानला केरळ पोलिसांच्या मदतीने दोन दिवस अगोदरच पकडण्यात आले होते. परंतु त्याला रितसह अटक रविवारी करण्यात आल्याची माहिती पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी दिली. त्यापूर्वी त्याला ताब्यात घेऊन त्याची केवळ चौकशी सुरू होती. सोमवारी अटक केल्यानंतर ट्रान्सीट वॉरन्ट घेऊन त्याला गोव्यात आणण्यात आले आणि जुने गोवे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
सुलेमान पोलिसांना सतत गुंगारा देत होता. त्यामुळे पोलिस त्याच्या घरापर्यंत पोहोचतील, असे त्याला कधी वाटले नसेल. परंतु अचानक पोलिसांचा छापा पडल्यावर तो भांबावून गेला आणि त्याला पळून जाण्याचाही वेळ मिळाला नाही. पोलिसांनी त्याला पत्नीसह ताब्यात घेतले.
सुलेमानला गुन्हे शाखेच्या कोठडीतून बाहेर काढून बडतर्फ कॉन्स्टेबल अमित नाईक त्याला थेट हुबळीत घेऊन गेला. तिथून हजरत अली बावन्नवार याला घेऊन सुलेमान पुढे गेला. मात्र, त्याने ) बावन्न्वारची साथ हुबळीत सोडली आणि एकटाच मंगळूरला पळाला. मंगळूरहून १४ डिसेंबर रोजी बंगळुरूला पोहोचला. तिथून त्याने पुण्यातील एका वकीलला फोन केला. या फोन कॉलची माहिती पोलिसांना मिळाल्यामुळे गोव्यहून एक पथक बंगळुरूला दाखल झाले, परंतु बंगळुरू पोहोचेपर्यंत सुलेमान तिथून निसटला होता आणि मुंबईला पोहोचला होता. त्यामुळे मुंबईला पोलिस पथक पाठविण्यात आले. मात्र तोपर्यंत तो तिथून थेट कारवारमध्ये आला.
पोलिसांना सुलेमान कारवारला आल्याची माहिती मिळताच गोव्यातून एक पथक कारवारमध्ये दाखल झाले. तोपर्यंत सुलेमान तिथून केरळमध्ये पोहोचला होता. केरळात एर्नाकुलम येथील घरात जाऊन राहिल्याची माहिती मिळताच याबाबत गोवा पोलिसांनी केरळच्या पोलिसांना कळवले. केरळ पोलिसांनी त्वरित त्या ठिकाणी जाऊन सुलेमान आणि त्याच्या पत्नीलाही अटक केली आणि याची माहिती गोवा पोलिसांना दिली.
दरम्यान, म्हापसा येथील प्रथम वर्ग न्यायालयाने सुलेमान सिद्दीकी खानच्या पत्नीला गुन्हा शाखेच्या विभागाकडे तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
१८ मोबाईलचा वापर
सुलेमान खान पोलिसांना चकवा देण्यासाठी जसे आपले वारंवार वास्तव्य बदलत होता त्याचप्रमाणे तो आपले मोबाईलही बदलत होता. सुलेमान आणि त्याची पत्नी अफसाना यांनी १८ मोबाईल या नऊ दिवसात वापरले. ते सर्व अठराही मोबाईल जुने गोवे पोलिसांनी जप्त केले आहेत.
बांधकाम कंपनी, चार फ्लॅट...
सुलेमानने जितके गुन्हे केले आहेत त्या सर्व गुन्ह्यात त्याची पत्नी अफसाना ही तितकीच भागिदार आहे, असे तपासातून समोर आल्याचे गुन्हे शाखेचे अधीक्षक राहुल गुप्ता यांनी सांगितले. सुलेमान व अफसाना यांची कारवार येथे एक बांधकाम कंपनी आहे. या कंपनीच्या नावे ४ फ्लॅट्सही आहेत. तसेच त्या दोघांची वेगवेगळ्या नावावर जवळपास १६ बँक खाती आहेत. त्याची बँक पासबुकही जप्त केली आहेत.
विमान, रेल्वे, कारद्वारे गोवा पोलिस केरळात
सुलेमानला एर्नाकुलम येथे केरळ पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच गोवा पोलिसांचे एक पथक वरिष्ठ अधिकाऱ्यांसह केरळला रवाना झाले होते. एक निरीक्षक विमानातून इतर दोन अधिकारी आणि कनिष्ठ कर्मचारी ट्रेनमधून तर बाकी अधिकारी पोलिस गाड्या घेऊन रवाना झाले होते. विमानाने गेलेला अधिकारी तिथे पोहचताच त्याला व त्याच्या पत्नीला केरळ पोलिसांच्या ताब्यातून घेऊन अटक केली.
तपासाचा प्रवास
जुने गोवे क्राईम बँच कोठडीतून थेट हुबळी, हुबळीहून मंगळूर, मंगळूरहून बंगळुरू, बंगळुरुहून मुंबई, मुंबईतून थेट कारवार, कारवारमधून एर्नाकुलम- केरळ (इथे अटक)