मांद्रेप्रश्नी सुदिन ढवळीकरांची सावध खेळी; मतदारसंघावर दावा कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 07:57 IST2025-03-21T07:56:59+5:302025-03-21T07:57:44+5:30

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दोन दिवसांपूर्वीच मांद्रे मतदारसंघात भाजप कार्यकर्ता मेळाव्यावेळी भाषण केले होते.

sudin dhavalikar cautious on mandre issue and claim over constituency remains | मांद्रेप्रश्नी सुदिन ढवळीकरांची सावध खेळी; मतदारसंघावर दावा कायम

मांद्रेप्रश्नी सुदिन ढवळीकरांची सावध खेळी; मतदारसंघावर दावा कायम

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: मांद्रे मतदारसंघ हा पारंपरिकपणे मगो पक्षाचा आहे. तिथे मगोपचा आमदार काम करतो. तरीही मुख्यमंत्री प्रमोद सावंत जे काही बोलले, ते योग्य आहे, कारण त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही काम करत राहायला हवे म्हणून त्यांनी तसे बोलणे हे रास्तच ठरते, अशी प्रतिक्रिया वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल व्यक्त केली.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दोन दिवसांपूर्वीच मांद्रे मतदारसंघात भाजप कार्यकर्ता मेळाव्यावेळी भाषण केले होते. कुणीही कशीही युती करावी पण मांद्रे हा भाजपचा मतदारसंघ असून तिथे भाजपचाच उमेदवार २०२७ च्या निवडणुकीवेळी असेल असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्याविषयी आज मगोपचे ज्येष्ठ नेते मंत्री सुदिन ढवळीकर यांना माध्यमांनी विचारले असता, ढवळीकर म्हणाले की, अगोदर भाऊसाहेब बांदोडकर मांद्रेतून निवडून यायचे. मग रमाकांत खलप मगो पक्षातर्फेच मांद्रेतून वारंवार निवडून आले. तो मतदारसंघ पारंपरिकपणे मगोपचा आहे.

रमाकांत खलप पराभूत झाल्यानंतर तो मतदारसंघ मगोपकड़े राहिला नव्हता. पण आता तिथे मगोपचा आमदार आहे. मगोपची कार्यकारिणी योग्यवेळी योग्य तो निर्णय घेईल, मुख्यमंत्र्यांच्या विधानाविषयी मी जास्त काही बोलत नाही.

सध्या मी 'मगो'त आहे, पुढचे सांगू शकत नाही 

मी मगो पक्षाच्या चिन्हावर निवडून आलो आहे. मगो सरकारचा घटकपक्ष आहे आणि मी मगोतच आहे. निवडणुकीला दोन वर्ष असून या काळात बरेच काही होऊ शकते. सध्या मांद्रे मतदारसंघात विकासकामे कशी होतील याकडे माझे लक्ष आहे. पुढील निर्णय कार्यकर्ते घेतील, अशी प्रतिक्रीया आमदार जीत आरोलकर यांनी दिली.
 

Web Title: sudin dhavalikar cautious on mandre issue and claim over constituency remains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.