sudden rise in death toll in the major cities of Goa | गोव्यातील प्रमुख शहरातील मृतांच्या संख्येत अकस्मात वाढ

गोव्यातील प्रमुख शहरातील मृतांच्या संख्येत अकस्मात वाढ

- सुशांत कुंकळयेकर

मडगाव:  गोव्यात कोविड मृतांची संख्या प्रत्यक्षात अधिक असताना बऱ्याचवेळा मृतांची स्वेब चाचणी न झाल्यामुळेच कोविड मृतांची संख्या कमी नोंद होत आहे का? सध्या असा आरोप होत आहे, त्याला पुष्टी मिळणारी माहिती मडगाव, पणजी आणि म्हापसा या गोव्यातील तीन प्रमुख शहरातून मिळत आहे. या तिन्ही शहरात असलेल्या हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी आणल्या जाणाऱ्या मृतदेहांची संख्या अकस्मात वाढली असून यातील बरेचसे मृत्यू कोविडमुळेच तर नसावेत ना अशी शंखा स्मशानभूमीचे व्यवस्थापनच व्यक्त करू लागले आहेत.

मडगाव येथील मठाग्रामस्थ हिंदू सभेच्या स्मशानभूमीत दर दिवशी किमान 6 बिगर कोविड मृतदेह  अंत्यसंस्कार करण्यासाठी आणले जात असून त्याशिवाय दर दिवशी दोन कोविड बाधित मृतांवर अंत्यसंस्कार केला जातो. म्हणजेच दर दिवशी किमान 8 मृतदेहांची क्रिया केली जाते. या स्मशानभूमीची व्यवस्था पाहणारे नारायण पै फोंडेकर याना विचारले असता हे प्रमाण नेहमीच्या सरासरीपेक्षा दुप्पट असल्याचे त्यांनी मान्य केले.

फोंडेकर म्हणाले, 'पूर्वी या स्मशानात दर दिवशी सरासरी 4 अंत्यसंस्कार केले जायचे ही संख्या आता 8 वर पोहोचली आहे'. या मागचे कारण काय असावे असे त्यांना विचारले असता ते म्हणाले, ज्यांच्यावर बिगर कोविड मृतदेह म्हणून अंत्यसंस्कार केले गेले त्यातील काही जणांना कोविडमुळे मृत्यू आल्याची शंका नाकारता येत नाही.

सांतीनेज पणजी येथील हिंदू स्मशानभूमीची व्यवस्था पाहणारे अवधूत आंगले यांनीही अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या मृतदेहांची संख्या अकस्मात वाढल्याने लाकडेही कमी पडू लागली असल्याची माहिती दिली. आंगले म्हणाले, पूर्वी सरासरी दर महिन्याला 30 ते 35 मृतदेहांवर आमच्या स्मशानात अंत्यसंस्कार केले जायचे आता ही संख्या 55 ते 60 एव्हढी वाढली आहे. त्यामुळे आमच्याकडे असलेली लाकडेही संपल्याने आम्हाला नवीन लाकडे आणावी लागली. पण पावसामुळे आम्हाला सुकी लाकडे मिळू शकली नाहीत.

म्हापसा येथेही अशीच स्थिती असल्याची माहिती स्मशान चालविणाऱ्या म्हापसा हिंदू समितीचे  अध्यक्ष अभय गवंडळकर यांनी सांगितले. ते म्हणाले, पूर्वी आमच्या स्मशानभूमीत कित्येकवेळा दहा दहा दिवस मृतदेह यायचेच नाहीत पण आता दररोज किमान तीन तरी मृतदेह आणले जातात. ही संख्या नेमकी कशी वाढली हे सांगणे कठीण असे ते म्हणाले.

त्यामानाने वास्को आणि फोंडा येथे स्थिती अजूनही सर्वसामान्य आहे अशी माहिती मिळाली वास्को येथिल हिंदू स्मशानभूमीशी संबंधित असलेले जितेंद्र तानावडे यांनी वास्को स्मशानभूमीत दरमहा 25 ते 30 जणांवर अंत्यसंस्कार केले जायचे ती स्थिती अजूनही तशीच असल्याचे सांगितले तर फोंडा येथेही पूर्वीसारखीच स्थिती आहे मात्र कोविड मृतदेहात वाढ झाली आहे अशी माहिती फोंड्याचे उप जिल्हाधिकारी केदार नाईक यांनी दिली.

विषाणू सगळीकडे पसरला आहे
कोविडमुळे गोव्यात एकंदरच मृतांची संख्या वाढली आहे या दाव्यात तसे तथ्य नाही. मृतांची संख्या पूर्वीप्रमाणेच आहे मात्र कोविड मृत्यूत एकदम वाढ झाली आहे अशी माहिती शशिरशास्त्र विभागाचे प्रोफेसर डॉ. मधू धोडकीरेकर यांनी दिली. ते म्हणाले, गोव्यात सगळीकडे कोविड विषाणू पसरला आहे हे कोणी नाकारू शकणार नाही. किती लोकांत तो पसरला आहे ते अँटीबॉडीज चाचणी केली तरच कळणार असे ते म्हणाले

बाधितांची संख्या सर्वात जास्त
राष्ट्रीय स्तरावर गोव्यात कोविड बाधितांची संख्या दर दहा लाख माणसामागे सर्वात जास्त असून दशलक्ष लोकांमधील 17,392 लोक बाधित झाले आहेत. मृतांच्या आकडेवारीत गोवा चौथ्या क्रमांकावर असून दर दहा लाख माणसामागे गोव्यात 212 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. पोंडीचेरी, महाराष्ट्र आणि दिल्ली ही राज्ये याबाबतीत गोव्यापेक्षा आघाडीवर आहेत.

डेंजरस कॉकटेल
गोव्यातील प्रमुख शहरात मृत्यूंचे प्रमाण अकस्मात वाढू लागल्यास त्यामागे काहीतरी खास कारण असणार हे नक्की. आणि कोविड सोडून दुसरे कारण दिसत नाही. इस्पितळात आणण्यापूर्वीच वाटेत लोक वाटेवर मेले आणि नंतर त्यांना कोविड झाल्याचे दिसून आले आहे. याचाच अर्थ कित्येक जण घरात कोविडने मेले पण इस्पितळात न आणल्याने  त्यांच्या मरणाचे कारण समजले नाही असा अर्थ निघू शकतो. एका बाजूने गोव्यातील बाधितांची सरासरी संख्या देशात सर्वात जास्त आहे आणि दुसऱ्या बाजूला मृतांची संख्या वाढू लागली आहे. हे सगळे धोकादायक असून ते डेंजरस कॉकटेल झाले आहे अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली.

Web Title: sudden rise in death toll in the major cities of Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.