मंत्र्याला कडक डोस; प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2025 09:02 IST2025-01-08T09:01:26+5:302025-01-08T09:02:23+5:30

मात्र काब्राल यांना बांधकाम खात्यातील नोकर भरतीच्या मुद्द्यावरून डच्चू दिला गेला.

strong dose to the minister goa bjp state president sadanand tanavade took note | मंत्र्याला कडक डोस; प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी घेतली दखल

मंत्र्याला कडक डोस; प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी घेतली दखल

 कायदा मंत्री आलेक्स सिक्वेरा यांना योग्य तो डोस सोमवारी भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिला आहे. जाहीरपणे एखाद्या मंत्र्याला त्याच्या राजकीय क्षमतेची किंवा त्याच्या उणिवांची जाणीव करून देण्याचे धाडस कधी कोणताच प्रदेशाध्यक्ष दाखवत नाही. मात्र तानावडे यांनी ते धाडस केले आहे. मुळात नीलेश काब्राल यांना मंत्रिमंडळातून डच्चू देऊन आलेक्स सिक्वेरा यांची तिथे नियुक्ती करण्याचे कारणच नव्हते. काब्राल मोठ्या आवाजात बोलणारे थोडे वेगळे नेते असले तरी, मंत्री म्हणून त्यांची कामगिरी कमी मोलाची नव्हती. ते सक्रिय होते. रात्रीच्या वेळीही कुणी फोन केला तर ते फोन कॉल घ्यायचे. शिवाय मिस्ड कॉल पाहून एखाद्या अपरिचितालादेखील फोन करायचे. समस्या सोडविण्याकडे काब्राल यांचा कल होता, हे अनेक आमदार आजदेखील सांगतात. मुळात काब्राल कुडचडे मतदारसंघातून निवडून आले ते सक्रियतेमुळेच. अर्थात, त्यांची कार्यपद्धत काहीजणांना दुखवणारी ठरली हा भाग वेगळा. तशी (स्व.) मनोहर पर्रीकर यांची कार्यशैलीदेखील काहीजणांना खूप दुखवत होती. मात्र काब्राल यांना बांधकाम खात्यातील नोकर भरतीच्या मुद्द्यावरून डच्चू दिला गेला.

काब्रालना बाजूला काढून सिक्वेरा यांना मंत्रिमंडळात घेतले गेले तरी, लोकसभा निवडणुकीवेळी भाजपला काही लाभ झाला नाही. सासष्टी तालुक्यात अल्पसंख्याकांनी भाजपला जास्त मते दिलीच नाहीत. सिक्वेरा यांना मंत्री केले तर, ख्रिस्ती धर्मगुरूदेखील आपल्या बाजूने राहतील, असे आभासी चित्र सिक्वेरा समर्थकांनी तयार केले होते. सिक्वेरा स्वतःच्या नुवे मतदारसंघातही भाजपला जास्त मते देऊ शकले नाहीत. या उलट सिक्वेरा सांगतात म्हणून सरकारने घाईघाईत नुवेतील काही जणांना लोकसभा निवडणुकीपूर्वी नोकऱ्या दिल्या होत्या. काहीजणांना तातडीने सेवेत कायम केले होते. सिक्वेरा यांच्या वाढदिनी प्रचंड गर्दी झाली होती. जणू काही पूर्ण नुवे मतदारसंघ आता भाजपमय झाला, असे तेव्हा काही भाजप नेत्यांनाही वाटले होते. मात्र नुवेत भाजपची सदस्य नोंदणीदेखील नीट होऊ शकली नाही. नुवेत भाजपला समाधानकारक प्रमाणातदेखील सदस्य मिळालेले नाहीत. मग आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिमंडळात का ठेवायचे, असा प्रश्न कदाचित भाजपला पडला असावा. परवा तानावडे यांनी जे भाष्य केले, त्यातून बरेच काही कळून येते. सिक्वेरा हे अवघड जागी झालेले दुखणे असे भाजपला व कदाचित तानावडे यांनाही आता वाटत असावे.

आलेक्स सिक्वेरा यांनी आत्मचिंतन करावे, असा सल्ला तानावडे यांनी उघडपणे सोमवारी दिला. जर सिक्वेरा यांना पुढील विधानसभा निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढवायची असेल तर त्यांना आत्मपरीक्षण करावेच लागेल असे तानावडे म्हणाले. सिक्वेरा मंत्रिपदी असूनदेखील नुवेत भाजपला जास्त सदस्य मिळू शकले नाहीत, अशी खंत प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केली. अर्थात, तानावडे यांना खंत जाहीरपणे व्यक्त करण्याचा निश्चितच अधिकार आहे. कारण सिक्वेरा यांना मोठ्या अपेक्षेने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने व मुख्यमंत्र्यांनी मिळून मंत्रिपद दिले होते. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या इतर आमदारांनी किंवा मंत्र्यांनी मोठ्या संख्येने भाजप सदस्य नोंदवून दाखवले आहेत. विश्वजित राणे व दिव्या राणे यांनी मिळून ५० हजार सदस्य नोंद केले. पणजी मतदारसंघातही खूप ख्रिस्तीधर्मीय मतदार आहेत पण तिथेही मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सोळा हजार सदस्य नोंद करून दाखवले. ताळगावमध्ये जेनिफर मोन्सेरात यांनी दहा हजारांहून अधिक सदस्य नोंदणी केली. मुरगावमध्ये संकल्प आमोणकर यांनीही कष्ट घेऊन बऱ्यापैकी सदस्य नोंदणी केली. वाळपई व मुरगावमध्ये मुस्लीम धर्मीयदेखील भाजपचे सदस्य झाले आहेत. जिथे आमदार किंवा मंत्र्यांनी आळस केला, पक्षकार्यात रस दाखवला नाही, तिथेच भाजपचे सदस्य वाढू शकलेले नाहीत. वास्तविक सिक्वेरा २०२७ ची निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढतील असे म्हणण्यास वाव नाहीच. भाजपचे तिकीट आपल्याला उपयुक्त ठरणार नाही असे त्यांना वाटले असावे. यापूर्वी सासष्टीत बाबाशान (विल्फ्रेड डिसा, नुवे) किंवा फिलीप नेरी रॉड्रिग्ज (वेळ्ळी) यांनीही भाजपचे तिकीट स्वीकारले नव्हते. असो. एखाद्या मंत्र्याला जाहीरपणे योग्य सल्ला देणारे तानावडे हे अलीकडच्या काळातील पहिले भाजप प्रदेशाध्यक्ष ठरले आहेत.
 

Web Title: strong dose to the minister goa bjp state president sadanand tanavade took note

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.