गोव्यात खासगी बस कर्मचा-यांच्या अचानक संपामुळे प्रवाशांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2018 21:53 IST2018-01-13T20:58:29+5:302018-01-13T21:53:59+5:30
कदंब महामंडळाच्या कर्मचा-याने खासगी बसचालकाला मारहाण केल्याच्या निषेधार्थ खासगी बसवाल्यांनी वाहतूक सेवा ७ तास बंद ठेवली.

गोव्यात खासगी बस कर्मचा-यांच्या अचानक संपामुळे प्रवाशांचे हाल
पणजी: कदंब महामंडळाच्या कर्मचा-याने खासगी बसचालकाला मारहाण केल्याच्या निषेधार्थ खासगी बसवाल्यांनी वाहतूक सेवा ७ तास बंद ठेवली. मारहाण प्रकरणी संशयित सुंदर जल्मी या कदंब महामंडळाच्या कर्मचा-याला अटक करण्याची मागणी करून पणजी पोलीस स्थानकासमोर जोरदार निदर्शने केली आणि त्याची अटक झाल्यानंतरच निदर्शने आणि बंद मागे घेणयत आला.
खाजगी बस ड्रायव्हर आणि कदंब महामंडळाच्या कर्मचा-यांचा कसल्या तरी कारणावरून वाद सुरू झाला. त्यानंतर तो झटापटीवर व हमरी तुमरीवरगेला. तेथे असलेल्या दीपक फडते या पोलीस कॉन्स्टेबलने या झटापटीचा मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्डींग करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कदंब कर्मचारी खवळले आणि त्यांनी फडते यालाच मारहाण केली. त्यामुळे खाजगी बसचालक आणि कंडक्टरनी बसेस तिथेच ठेून बसस्टेंडच्या एका कोप-यात येऊन गर्दी केली आणि नंतर खाजगी वाहतूक सेवा बंद करीत असल्याची घोषणा केली. त्याची माहिती त्यांनी फोंडा व म्हापसा येथील त्यांच्या सहका-यांना दिल्यामुळे तितेही बंद करण्यात आला.
फडते हा त्यावेली ड्युटीवर नव्हता, परंतु त्याला मारल्यामुळे नव्हे तर अगोदरच्या दिवशी साईनाथ नाईक या खाजगी बस चालकाला कदंबच्या कर्मचा-यांनी मारहाण केल्याची तक्रार साईनाथ याने कदंबचा कर्मचारी सुंदर जल्मी आणि इतर तिघांच्या विरोधात पणजी पोलीसस्थानकावर नोंदविली होती. तक्रार नोंदवूनही या प्रकरणात गुन्हा नोंदवून घेण्यात न आल्यामुळे संतापलेल्या खाजगी बसवाल्यांनी सुंदरला अटक करण्याची मागणी करून पोलीस स्थानकावर मोर्चा नेला. दोन तास हा मोचा पणजी पोलीस स्थानकासमोर होता. पोलिसांनी केलेल्या वाटाघाटीनाही त्यांनी दाद दिली नाही. शेवटी सुंदरला पोलिसांनी अटक केल्यानंतरच मोर्चा आणि बंदही मागे घेण्यात आला. सुंदरला नंतर जामीनवर सोडण्यात आले.
कदंब महामंडळाचे कर्मचारी आणि खासगी बसवावाले यांच्यातील तंट्यामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागला. सकाळी ११.३० वाजता बंद करयात आलेल्या खाजगी बसगाड्या या संध्याकाळी ६ पर्यंत बंदच होत्या. पणजीतच नव्हे तर या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटले होते. म्हापसा आण फोंड्यातील खासगी बससेवाही स्थगित ठेवण्या आली होती. त्यामुळे म्हापसा, पणजी आणि फोंड्यातील लोकाना त्याचा अधिक त्रास झाला.
दरम्यान कदंब महामंडळाचे कर्मचारी आणि खाजगी बससेवेतील कंडक्टर व चालक यांच्यात ब-याच दिवसांपासून वाद सुरू होता. कदंब कर्मचा-यांनी त्यांच्या समस्या कदंब महामंडळाचे अध्यक्ष आमदार कार्लुस आल्मेदा यांच्या कानावर घातल्या होत्या. शनिवारी सकाळीच आल्मेदा यांनी कर्मचा-यांना भेटून त्यांच्या समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले होते.