'स्वयंपूर्ण गोवा' मोहिमेला बळ दे; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे देवी लईराईला साकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 08:07 IST2025-05-03T08:06:46+5:302025-05-03T08:07:54+5:30
जत्रोत्सवानिमित्त सपत्नीक दर्शन

'स्वयंपूर्ण गोवा' मोहिमेला बळ दे; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे देवी लईराईला साकडे
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : भारताला वैभवाच्या शिखरावर पोचवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न साकार व्हावे. तसेच स्वयंपूर्ण गोवा संकल्पनेला बळ मिळावे, अशी प्रार्थना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.
शिरगावात आजपासून लईराई देवीच्या प्रसिद्ध जत्रोत्सवास सुरुवात झाली. त्यानिमित्त सकाळी मुख्यमंत्र्यांनी मंदिरात जाऊन देवीचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी समस्त गोमंतकीयांना उत्तम आरोग्य, आयुष्य व समृद्धी लाभावी, गोवा आदर्श राज्य निर्माण व्हावे, प्रत्येकाच्या घरात सुख-समृद्धीचा दिवा प्रज्वलित राहावा, अशी प्रार्थना देवी लईराईच्या चरणी केली.
यावेळी त्यांच्यासोबत सुलक्षणा सावंत, खासदार सदानंद तानवडे, आमदार प्रेमेंद्र शेट, मंत्री नीळकंठ हळर्णकर, देवस्थान अध्यक्ष दिनानाथ गावकर, उत्तर गोवा अध्यक्ष कारबोटकर, रुपेश ठाणेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. शिरगांव येथील सुप्रसिद्ध जत्रोत्सवास शुक्रवारी मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला.
गोवा राज्य आदर्श राज्याच्या दिशेने वाटचाल करीत असून सरकार व जनता यांच्यात सामंजस्य निर्माण होताना अनेक योजना चालीस लागत असल्याचे सांगितले. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी गोव्याची जनताही योगदान देत असून त्यांना समृद्धी लाभावी, अशी प्रार्थना त्यांनी केली.
सीमावर्ती भागातूनही भाविक दाखल
देवी लईराईच्या जत्रोत्सवासाठी राज्याच्या विविध भागातून जसे धोंड आणि भाविक दर्शनासाठी दाखल झालेत. तसेच सिंधुदुर्ग आणि अन्य सीमावर्ती भागातूनही भाविक दाखल झाले होते. त्यामुळे मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता. दर्शनसाठी भाविक रांगेने जाताना दिसत होते. यामध्ये जसे पुरुष धोंड दाखल झालेत. तसेच महिला आणि लहान बालकेही मोठ्या उत्साहाने धोंड बूनून देवीच्या दर्शनासाठी येताना दिसत होते. देवीच्या तळीमध्ये स्नानासाठी एक एक गट जात होते. तेव्हा मोठ्या स्वरात आणि सामुदायिकरित्या नामस्मरण केले जात होते. वाहतूक कोंडी रोखण्यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती.