पत्नी दमल्याने बेसपॉइंटवर थांबलो अन् बचावलो; पोलीस उपअधीक्षकांनी सांगितली काश्मीरमधील आपबीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 12:40 IST2025-04-24T12:39:43+5:302025-04-24T12:40:15+5:30
पत्नी आणि मुलगा पुढे जाण्यास तयार नसल्याने मीही त्यांच्यासोबत थांबलो. अन्यथा आमच्याही नावाने तिथे एक बुलेट निश्चितच होती, अशा शब्दांत पोलीस उपअधीक्षकांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या.

पत्नी दमल्याने बेसपॉइंटवर थांबलो अन् बचावलो; पोलीस उपअधीक्षकांनी सांगितली काश्मीरमधील आपबीती
अजय बुवा, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: चार दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या पर्यटनाचा आस्वाद घेण्यासाठी गेलेले फोंडा विभागाचे पोलिस उपअधीक्षक शिवराम वायंगणकर यांच्या अंगावर काटा आणण्याचा प्रसंग काल पहलगाममध्ये उद्भवला. तीन दिवस काश्मीर पर्यटनाचा आनंद घेतलेल्या पत्नीला थकवा जाणवला व तिने बेसपॉईंटवर राहण्याचा निर्णय घेतला, अन्यथा ठरल्याप्रमाणे ते जर गेले असते तर बरोबर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराची शिकार झाले असते, अशा शब्दांत उपअधीक्षक शिवराम वायंगणकर यांनी आपला अनुभव कथन केला.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वांबरोबर ते मिनी स्वीझर्लंडच्या पॉईंटवर जाण्यासाठी निघाले होते. दुपारी एक वाजता ते खाली बेस पॉईंटवर पोहोचले. इथून पुढे घोड्याच्या माध्यमातून वर जायचे होते. त्यांनी या संदर्भात चाचपणीसुद्धा केली, परंतु त्यांच्या पत्नीने पुन्हा एकदा घोड्यावर बसून प्रवास करण्यास नकार दिला. कारण तिथे गेल्यापासून घोड्यावरूनच प्रवास झाल्याने तिचे अंग दुखू लागले होते. वरचा स्पॉट बघण्यास तिने सपशेल नकार दिला व नवऱ्याला व मुलांना जाऊन येण्यास सांगितले. मात्र आई नाही तर आपणही जात नाही, असा पवित्रा मुलानेपण घेतला. त्यामुळे मुलाने वर जाण्यास नकार दिला. परिणामी तुम्ही दोघेही जात नाही तर मी वर एकटेच जाऊन काय करू, असे म्हणून उपअधीक्षक वायंगणकर यांनी सुद्धा खाली बेस पॉईंटवर राहण्याचाच निर्णय घेतला.
गोळीबार झाला अन् लोक सैरभर पळत सुटले
डोंगराळ भागातील पर्यटनस्थळ पाहण्यास गेलेले बाकीचे पर्यटक खाली येईपर्यंत तिथे असलेल्या बागबगीचा बघण्याचा निर्णय घेतला. इतरांबरोबर निघाले असते तर बरोबर पावणे दोन वाजण्याच्या दरम्यान ते मिनी स्वित्झर्लंडला पोहोचले असते. जिथे दहशतवाद्यांचा हल्ला झाला तिथे पोहोचले असते व त्यांच्या गोळ्यांची शिकार नक्कीच झाले असते. ते खाली गार्डनमध्ये सैर करत असताना वर गोळीबार होत असल्याच्या आवाज आला.
किंकाळ्या आणि सायरनचा आवाज
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे लोक बिथरले व लोक सैरावरा धावत खाली येऊ लागले. त्या पाठोपाठ लगेचच सीआरपीएफच्या जवानांकडून बेस पॉईंटवर असलेल्या पर्यटकांना आपल्या ताब्यात ठेवले. नंतर त्या रस्त्यावरून फक्त अॅम्बुलन्स व सीआरपीएफच्या गाड्या व लोकांच्या किंकाळ्या एवढेच ऐकू येत होते, अशा शब्दात त्यांनी त्या घटनेचे वर्णन केले.
दैव बलवत्तर म्हणून...
पत्नीने डोंगराळ भागातील पर्यटनस्थळ बघण्यास नकार दिला, अन्यथा आमच्याही नावाने तिथे एक बुलेट निश्चितच होती, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. २५ एप्रिलला उपअधीक्षक शिवराम वायंगणकर हे गोव्यात पोहोचत आहेत