नरकासुर प्रथा बंदच करा: सुदिन ढवळीकर; 'लोकमत'मधील माझा लेख अवश्य वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 11:16 IST2025-10-23T11:14:52+5:302025-10-23T11:16:07+5:30
दिवाळीच्या पूर्वसंध्येला धिंगाणा घालणारे जणू नरकासुरच

नरकासुर प्रथा बंदच करा: सुदिन ढवळीकर; 'लोकमत'मधील माझा लेख अवश्य वाचा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : नरकासुराच्या रात्री गोव्यात धांगडधिंगा, भांडणे, मद्यप्राशन व मस्ती वाढल्याने वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी राज्यात नरकासुर प्रथा बंदच करा, असे लोकांना सुचविले आहे. बुधवारी मीडियाशी बोलताना मंत्री ढवळीकर यांनी गोव्यातील विरोधी पक्षांच्या आघाडीचाही समाचार घेतला. दिवाळीच्या पूर्वसंध्येला दारू पिऊन धिंगाणा घालणारेच जणू एकप्रकारचे नरकासुरच, पण, सत्ताधारी ३३ आमदार नरकासुर नव्हेत, असेही ते म्हणाले.
काँग्रेस, गोवा फॉरवर्ड व आरजी यांनी सत्ताधारी भाजप विरोधात युती केली, तरी ती जास्त काळ मुळीच टिकणार नाही. विरोधी पक्षांच्या ऐक्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना ते म्हणाले की, विरोधी आघाडीतील नेते अनेक राजकीय पक्ष फिरून आलेले आहेत. त्यामुळे ते एकत्र राहणार नाहीत, हेच खरे.
'लोकमत'मधील माझा लेख अवश्य वाचा
ढवळीकर म्हणाले की, 'आमचे विरोधक तसेच जे कोणी नरकासुराचा उदोउदो करतात त्यांनी 'लोकमत' मध्ये छापून आलेला माझा लेख अवश्य वाचावा. नरकासुर प्रथा म्हणजे काय? हे मी सविस्तरपणे लिहिले आहे. नरकासुराच्या रात्री जे व्यासपीठावर होते, रात्रभर धिंगाणा घालत होते, तेच खरे नरकासुर! दुसऱ्याला नावे ठेवण्याआधी काय करतोय, हे त्यांनी ध्यानात ठेवायला हवे.'
फोंड्याबाबत भाजप निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य
दरम्यान, फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीबाबत ढवळीकर यांनी भाजपला पाठिंबा दिला. ते म्हणाले की, 'आम्ही भाजपसोबत युतीत आहोत. फोंडा मतदारसंघाबाबत भाजप जो काही निर्णय घेईल, त्याचे समर्थन करू.'
वीज दरवाढीबद्दल विचारले असता ढवळीकर म्हणाले की, 'सर्वसामान्य किंवा मध्यमवर्गीयांना फारशी झळ बसलेली नाही. सर्वच मिळून केवळ दहा पैसे वाढलेले आहेत. ४०० पेक्षा जास्त युनिट वापरल्यास मात्र जादा बिल येईल.
वीज खाते पायाभूत सुविधा उभारण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करते. त्यामुळे दरवाढ करावी लागते. संयुक्त वीज नियामक आयोगाने घालून दिलेल्या चौकटीतच आम्ही दरवाढ केलेली आहे.'
वीज दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका नाही
वीज बिलांमध्ये पथदीप अधिभार लागू केला जातो. परंतु, प्रत्यक्षात रस्त्यावरील दिवे कार्यान्वित नाहीत, याकडे लक्ष वेधले असता ढवळीकर म्हणाले की,' दिवाळीत आम्ही कोणाचीही गैरसोय केलेली नाही. सर्वांना वीज दिलेली आहे. ज्या काही तक्रारी आल्या त्या तातडीने सोडवलेल्या आहेत. दिवाळीच्या दिवशी तर सकाळी नऊ वाजेपर्यंत कदंब पठारावरील रस्त्यालगतचे पथदीप सुरूच होते. मी फोन केल्यानंतरच ते बंद करण्यात आले. सरकारने केलेली दरवाढ माफक असून सर्वसामान्य किंवा मध्यमवर्गीयांना कोणताही त्रास झालेला नाही.'
नरकासुर कोण, देवाचे माणूस कोण? हे जनतेला समजतेय : दामू नाईक
भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांना फातोर्थ्यातील कार्यक्रमात विरोधकांनी उल्लेख केलेले ३३ नरकासुर, तसेच विरोधकांच्या युतीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, 'गोव्यातील जनतेला कोण नरकासुर आणि कोण देवाचे माणूस हे बऱ्यापैकी ठाऊक आहे. नरकासुर रात्रीच्यावेळी जागे होतात, तर भगवान श्रीकृष्णाला मानणारे लोक आमच्यासारखे सकाळपासून काम करतात. आज गोमातेच्या पूजनाच्या दिवशी मला नरकासुराविषयी काही बोलायचे नाहीय.'