खाणकाम सुरू करा; पण कुडचडेत कोळसा नकोच, स्थानिकांचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 13:16 IST2026-03-23T13:15:48+5:302026-03-23T13:16:26+5:30

जेटीवर रोजगार देण्याची मागणी

start mining but do not let coal go to kudchade warn locals | खाणकाम सुरू करा; पण कुडचडेत कोळसा नकोच, स्थानिकांचा इशारा 

खाणकाम सुरू करा; पण कुडचडेत कोळसा नकोच, स्थानिकांचा इशारा 

लोकमत न्यूज नेटवर्क, कुडचडे : कोळशाला कुडचडेतून १०० टक्के विरोध असल्याने येथे कोळसा येऊ देणार नाही, असा निर्धार नागरिकांनी केला आहे. खामामळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ग्रामस्थांनी कोळसा प्रकल्पाला ठाम विरोध दर्शवितानाच रोजगारासाठी खाणकाम तातडीने सुरू करण्याची मागणी केली. गावात कोणत्याही परिस्थितीत कोळसा येऊ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका यावेळी मांडण्यात आली.

पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष प्रमोद नाईक, नगरसेवक प्रसन्ना भेंडे, रायसू नाईक, सायसू देसाई, अर्चना नाईक यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रायसू नाईक यांनी सांगितले की, कुडचडेत कोळशाचा विषय गाजत असल्यामुळे खामामळ येथेही कोळसा येणार अशी भीती आहे. मात्र, या जेटीवर कोळशाला विरोध आहे. ७० वर्षांपूर्वीपासून येथे खाणकाम सुरू होते. पूर्वी जेटी लहान होत्या. मात्र, रोजगार वाढविण्यासाठी त्यांचा विस्तार केला. २०२१मध्ये सुरू केलेले काम काही युवकांनी बंद पाडले. त्यावेळी दिनार तारकर यांनी मध्यस्थी केली होती.

नगराध्यक्ष नाईक यांनी सांगितले की, गावातील लोकांना कोळसा नको असेल तर तो कोणालाही नको. हा मुद्दा आमदारांनी विधानसभेतही मांडला असून, कोणतीही गैरप्रकाराची घटना घडल्यास त्यावर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

नगरसेवक भेंडे यांनी सांगितले की, कोळसा आल्यास सर्वांनाच त्रास होणार असून, तो येथे येऊ दिला जाणार नाही. स्थानिकांचा व्यवसाय जेटीवर अवलंबून आहे. खाणकाम बंद झाल्यापासून सर्व आर्थिक हालचाली ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे खाणकाम पुन्हा सुरू करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

खाणी बंद झाल्यानंतर फरफट थांबता थांबेना

पूर्वीपासून येथे खाणकाम सुरू होते. ते बंद झाल्यामुळे लोकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे बंद पडलेले खाणकाम पुन्हा सुरू करावे, अशी मागणी अर्चना नाईक यांनी केली. खामामळ येथील नागरिकांचा कोळशाला तीव्र विरोध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एकूणच, खामामळ कुडचडे येथे कोळसा प्रकल्पाला तीव्र विरोध असून, स्थानिकांच्या रोजगारासाठी खाणकाम तातडीने सुरू करण्याची एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.
 

Web Title : खनन शुरू करो, पर कुडचडे में कोयला नहीं: स्थानीय लोगों की चेतावनी

Web Summary : कुडचडे के निवासियों ने कोयले का विरोध किया, नौकरियों के लिए तत्काल खनन की मांग की। उन्हें खाममाळ जेटी पर कोयले का डर है। खनन बंद होने से स्थानीय अर्थव्यवस्था चरमरा गई है। अधिकारियों ने उल्लंघन के खिलाफ कार्रवाई का वादा किया।

Web Title : Start Mining, But No Coal in Kudchade: Locals Warn

Web Summary : Kudchade residents vehemently oppose coal, demanding immediate mining for jobs. They fear coal at Khamamળ jetty. Mining cessation has crippled local economy. Authorities pledge action against violations.