गोव्यातील लईराई जत्रेत चेंगराचेंगरी: ६ ठार, ८० जखमी; राज्यभर हळहळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 10:05 IST2025-05-04T10:05:07+5:302025-05-04T10:05:10+5:30
५ जण अत्यंत गंभीर, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश; सत्यशोधन समिती स्थापन, लईराई देवीच्या धोंडांमधील वाद दुर्घटनेचे कारण ठरल्याचा दावा

गोव्यातील लईराई जत्रेत चेंगराचेंगरी: ६ ठार, ८० जखमी; राज्यभर हळहळ
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली/म्हापसा/पणजी: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील प्रसिद्ध देवी लईराईच्या जत्रोत्सवात शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास चेंगराचेंगरीची घटना घडली. यात सहा भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर ८० जण जखमी झाले असून ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दुर्घटनेची गंभीर दखल घेत काही अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करत महसूल सचिव संदीप जॅकीस यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती स्थापन केली आहे. या समितीने सायंकाळी शिरगावला भेट देऊन आपले काम सुरू केले.
शिरगावात लईराईच्या जत्रोत्सवातील अग्निदिव्यावेळी शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास चेंगराचेंगरीची घटना घडली. पोलिसांनी तातडीने दखल घेत उसळलेल्या गर्दीवर नियंत्रण मिळवत जखमींना तातडीने साखळी, डिचोली, म्हापसा व गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यास सुरुवात केली. या घटनेत सहाजणांचा जागीच मृत्यू झाला तर ८० जखमी झाले. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील काकू आणि पुतण्याचा समावेश आहे.
प्रघटनेची माहिती मिळवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डिचोली व नंतर गोमेकॉत जाऊन मृतांच्या नातेवाइकांची भेट घेतली. तसेच जखमींची विचारपूसही केली. त्यानंतर सायंकाळी उच्चस्तरीय समितीची बैठक घेतली. या बैठकीत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना १० लाखांची तर जखमींना १ लाख रुपयांची मदत जाहीर केली. पाच अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्यांचेही आदेश दिले.
तीन दिवस दुखवटा; सार्वजनिक कार्यक्रम रद्द
शिरगाव येथील देवी लहराई जत्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. मृतांना आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करण्यासाठी सरकारने पुढील तीन दिवसांत होणारे सर्व सरकारी आणि सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत.
दुर्घटनेने मन हेलावले; ठोस पावले उचलू : मुख्यमंत्री
शिरगाव येथील देवी लईराईच्या जत्रोत्सवात घडलेली चेंगराचेंगरीची घटना अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावणारी आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सत्यशोधन समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीने शिरगाव येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे. तसेच देवस्थान समितीच्या पदाधिकारी, ग्रामस्थांशीही त्यांनी चर्चा केली आहे. लवकरच घटनेचा संपूर्ण अहवाल मिळेल. त्यानंतर ठोस पावले उचलली जातील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. जखमींना डिचोली, साखळी, म्हापसा व गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यास सुरुवात केली.
मुख्यमंत्र्यांकडून सत्यशोधन समिती स्थापन
दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय सत्यशोधन समिती स्थापन करण्यात आली आहे. महसूल सचिव संदीप जॅकीस यांच्या अध्यक्षतेखाली या समितीत पोलिस महानिरीक्षक वर्षा शर्मा, दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी इग्ना क्लीटस व दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक टीक्कम वर्मा, वाहतूक खात्याचे संचालक परिमल अभिषेक यांचा समावेश आहे.
६ मे : देव मंदिरात जातात; त्यावेळी गर्दी करू नका
लईराई देवीच्या कौलोत्सवास शनिवारी दुपारपासून सुरुवात झाली आहे. ६ रोजी देव मंदिरात जाणार आहेत. दरवर्षी या दिवशीही भाविकांची प्रचंड गर्दी होते. मात्र, यंदा भाविकांनी गर्दी करू नये, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी केले आहे.
यशस्विनी बी.; राहुल गुप्ता यांची नियुक्ती
चेंगराचेंगरीनंतर स्नेहा गीते यांची कचरा व्यवस्थापन खात्याच्या संचालकपदी बदली केली आहे, तर त्यांच्या जागी उत्तर गोवा जिल्हाधिकारीपदी यशस्विनी बी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच उ. गोवा पोलिस अधीक्षकपदाचा ताबा आयपीएस राहुल गुप्ता यांच्याकडे देण्यात आला आहे.
व्हिडीओची चौकशी
चेंगराचेंगरी घटनेपूर्वी धोंडांच्या दोन गटांत वाद झाला. या वादानंतर झालेल्या धक्काबुक्कीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. चेंगराचेंगरीला व्हिडीओमधील वादच कारणीभूत आहे का? याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी दिली आहे. जत्रोत्सवावेळी १ हजार पोलिस बंदोबस्तासाठी नेमण्यात आले होते. घटना घडताच त्यांनी तातडीने गर्दीवर नियंत्रण मिळवले व जखर्मीना इस्पितळात पोहोचवल्याचेही डीजीपींनी सांगितले.
नेमके काय घडले?
लईराई देवस्थानचे अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल पहाटे लईराईच्या जत्रोत्सवात अग्निदिव्यासाठी धोंड निघाले होते. त्याचवेळी धोंडांमधील दोन गटांत वाद होऊन धक्काबुक्की सुरू झाली. त्यामुळे धोंडांसह भाविक पळू लागले, त्यातील काहीजण खाली पडले तर काहीजण जत्रेत लावलेल्या स्टॉलवर जाऊन पडले. त्याचवेळी या स्टॉलला पुरवलेल्या विजेच्या केबल्सना काहीजणांचा स्पर्श होऊन त्यांना शॉक बसला. त्यामुळे गोंधळ उडाला व चेंगराचेंगरी झाली. यात सहा निष्पाप लोकांचा बळी गेला.
शिरगावातील दुर्घटनेचा घटनाक्रम
पहाटे ३.१५ वाजता: लईराई देवीच्या मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाली.
पहाटे ३.४५ वाजता: पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवत जखमींना डिचोली, साखळी, म्हापसा व गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यास सुरुवात केली.
पहाटे ५.१५ वाजता : मुख्यमंत्री प्रमोद सावंत डिचोली आरोग्य केंद्रात दाखल झाले.
पहाटे ५.३० वाजता: म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात मंत्री नीळकंठ हळर्णकर, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार प्रेमेंद्र शेटे दाखल.
सकाळी ७.०० वाजता : मुख्यमंत्र्यांनी म्हापसा येथे उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात आऊन मृतांच्या नातेवाईकांची व जखमींची भेट घेतली.
सकाळी ८.३० वाजता गोमेकॉ इस्पितळात मुख्यमंत्री दाखल. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा
सकाळी १० वाजता : मुख्यमंत्र्यांनी शिरगाव येथील लईराई देवस्थानला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली.
दुपारी ३.३० वाजताः मुख्यमंत्र्यांनी पणजीत उच्चस्तरीय समितीची बैठक घेत दुर्घटनेच्या चौकशीसाठी सत्यशोधन समिती
सायंकाळी ४.०० : काँग्रेसच्या नेत्यांची शिरगावला भेट. देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून घटनेची माहिती घेतली.
सायंकाळी ५.३० : वाजता उच्चस्तरीय समितीकडून शिरगावची पाहणी. मंदिराच्या सभागृहात देवस्थान समितीसोबत बैठक. ग्रामस्थांशीही साधला संवाद
शिरगाव येथील घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. आपण गोमेकॉसह जखर्मीना दाखल केलेल्या इस्पितळांवर लक्ष ठेवून आहे. गोमेकॉच्या सर्व विभागप्रमुखांनाही ड्युटीवर येण्यास सांगितले आहे. या घटनेत ८० जखमी असून त्यापैकी १३ जण हे गोमेकॉत उपचार घेत आहेत, यातील पाचजणांची प्रकृती गंभीर आहे. - विश्वजित राणे, आरोग्यमंत्री
लईराई जत्रेत घडलेल्या घटनेबद्दल दुःख आहे. आता सरकारने योग्य ती दखल घ्यावी. तसेच या यात्रेसाठी अधिक सुरक्षा यंत्रणा पुरवावी. मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करणार आहे. - श्रीपाद नाईक, केंद्रीय राज्यमंत्री
ही घटना अत्यंत दुःखदायक आहे. लोकांनी संयम पाळावा. लईराई देवळात जाणे आता तात्पुरते थांबवा. एकदम गर्दी करू नका. ६ दिवसांत टप्प्याटप्प्याने देवीच्या भेटीला जावे. - सुदिन ढवळीकर, वीजमंत्री.
शिरगावची दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या कठीणप्रसंगी आम्ही त्या कुटुंबांच्या दुःखात सहभागी आहोत. या दुर्घटनेची सरकारने कसून चौकशी करावी. भविष्यात अशा घटना होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. - युरी आलेमाव, विरोधी पक्षनेता
राज्य उत्सव म्हणून घोषित केलेल्या लईराई जत्रेत चेंगराचेंगरी व्हावी हे प्रशासकीय यंत्रणेचे अपयश आहे. सुरक्षेसाठी १ हजार पोलिस नियुक्त केले असतानाही असे कसे घडले? मृतांच्या कुटुंबाला १ कोटी रुपये द्यावेत. - विजय सरदेसाई, आमदार.
जत्रेवेळी जी घटना घडली त्यामध्ये प्रशासनाची कोणतीही चूक नाही. सरकार, पोलिस यंत्रणा व देवस्थान समितीने योग्य प्रकारे नियोजन केले होते. मात्र, काही धोंडांमधील दोन गटांत झालेल्या वादानंतर चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली. - दीनानाथ गावकर, अध्यक्ष, लईराई देवस्थान.