नववर्ष स्वागतासाठी सुरक्षेची विशेष तयारी; कळंगुट-बागा, वास्को, कोलवा व काणकोणात निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 08:06 IST2025-12-30T08:04:18+5:302025-12-30T08:06:00+5:30

सुरळीत वाहतुकीसाठी किनारी भागात विविध उपाययोजना जाहीर

special security preparations for new year eve in goa restrictions in calangute baga vasco colva and canacona | नववर्ष स्वागतासाठी सुरक्षेची विशेष तयारी; कळंगुट-बागा, वास्को, कोलवा व काणकोणात निर्बंध

नववर्ष स्वागतासाठी सुरक्षेची विशेष तयारी; कळंगुट-बागा, वास्को, कोलवा व काणकोणात निर्बंध

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पर्यटन हंगामाच्या शिखर काळात आणि नववर्ष २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर गोव्यात पर्यटकांचा मोठा ओघ अपेक्षित असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गोवा वाहतूक पोलिसांनी राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळांवर विशेष वाहतूक नियोजन लागू केले आहे. ही व्यवस्था नववर्षाच्या पूर्वसंध्येला तसेच नववर्षदिनी लागू राहणार आहे.

कळंगुट-बागा परिसरात ३० डिसेंबर २०२५ ते १ जानेवारी २०२६ या कालावधीत तात्पुरती वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली आहे. भारत जंक्शन ते टिटोज सर्कल (मॅम्बोज क्लब) हा मार्ग दुपारी ३ ते सकाळी ६ वाजेपर्यंत नॉन-मोटराइज्ड झोन म्हणून घोषित करण्यात आला असून, या काळात या मार्गावर वाहनांना प्रवेशास बंदी राहील. पाणी टैंकर, एलपीजी सिलिंडर वाहने आणि सांडपाणी वाहने यांना सकाळी ६ ते १० या वेळेतच प्रवेश दिला जाणार आहे. अंतर्गत रस्त्यांवरील कोंडी टाळण्यासाठी विविध मार्गावर एकमार्गी वाहतूक लागू करण्यात आली असून, चारचाकी वाहनांसाठी ठराविक ठिकाणी तात्पुरती पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

तसेच जड व मध्यम स्वरूपाची पर्यटक वाहने १ २९ डिसेंबर ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत कळंगुट परिसरात प्रवेश करू शकणार नाहीत. वास्कोतील बोगमाळो परिसरात ३१ डिसेंबर 3 रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून १ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजेपर्यंत बोगमाळो बीचकडे जाणारा मुख्य रस्ता तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे. दाबोळीहून येणारी वाहतूक अंतर्गत मार्गावरून वळवण्यात येईल. या कालावधीत जड व मध्यम वाहनांना बोगमाळो बीचकडे जाण्यास मनाई राहील. बीच परिसरात चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

कोलवा आणि बाणावली परिसरात बीचकडे ३ जाणाऱ्या वाहनांसाठी ठराविक पार्किंग ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. कोलवा सर्कलमधून बीचकडे जाणाऱ्या जड व मध्यम वाहनांवर बंदी राहील. ३१ रोजी दुपारी २ वाजल्यापासून १ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत काही मार्गावर एकमार्गी वाहतूक लागू राहणार आहे.

काणकोण तालुक्यात पाळोळे व देवबाग परिसरात साई फॅमिली रेस्टॉरंट, क्रीडा संकुलाजवळील मोकळी जागा, पाळोळे क्लब परिसर तसेच भातखाचरांमध्ये तात्पुरती पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे. नववर्षाच्या काळात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी अपेक्षित आहे, त्या सर्व भागांत अशीच वाहतूक व्यवस्था लागू केली जाणार आहे.

हे नियम पाळा

वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना हेल्मेटचा वापर करण्याचे, मद्यधुंद वाहनचालना टाळण्याचे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर न करण्याचे, लेन शिस्त पाळण्याचे आणि केवळ अधिकृत पार्किंग ठिकाणीच वाहने उभी करण्याचे आवाहन केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
 

Web Title: special security preparations for new year eve in goa restrictions in calangute baga vasco colva and canacona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.