जंगल संवर्धनासाठी मृदा आरोग्य कार्ड उपयुक्त: वनमंत्री विश्वजीत राणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 11:40 IST2025-09-16T11:39:31+5:302025-09-16T11:40:36+5:30
वाळपईत वन प्रशिक्षण केंद्रामध्ये विशेष कार्यक्रम, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन : वृक्षारोपणाचे आवाहन

जंगल संवर्धनासाठी मृदा आरोग्य कार्ड उपयुक्त: वनमंत्री विश्वजीत राणे
लोकमत न्यूज नेटवर्क, नगरगाव : वैश्विक तापमान वाढीच्या संकटावर उपाय शोधायचा असेल तर जंगलांचे संवर्धन अत्यावश्यक आहे. यासाठी वन खात्यांच्या जमिनींचे मृदा संशोधन कार्ड (आरोग्य कार्ड) करणे महत्त्वाचे ठरेल, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले.
वाळपई येथील वन प्रशिक्षण केंद्रामध्ये झालेल्या विशेष कार्यक्रमात त्यांनी या उपक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी व्यासपीठावर वनविभागाचे अधिकारी कमल दत्ता, के. रमेश कुमार, प्रवीण कुमार राघव, एन. पलनीकांत बेंगलोर, अंकित कुमार, वनविभागाचे इतर अधिकारी, वाळपई वन प्रशिक्षण केंद्राचे विश्वनाथ पिंगुळकर उपस्थित होते.
मंत्री म्हणाले की, जमिनींचे आरोग्य कार्ड तयार झाल्यामुळे कोणत्या जमिनीत कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आहे, त्यानुसार त्या जमिनीस योग्य खत व्यवस्थापन करता येईल. त्यामुळे झाडांची वाढ जोमाने होईल आणि त्या जंगलाच्या परिस्थितीनुसार योग्य झाडांची निवड करून लागवड करता येईल. त्यामुळे झाडांचे व मातीचे आरोग्य सुधारेल, फळे फुले मुबलक येतील आणि जंगलातील वन्यजीवांचे संगोपनही शक्य होईल.
वन अधिकाऱ्यांना चांगल्या ठिकाणी प्रशिक्षण देणे, त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे हीही काळाची गरज असल्याचे मंत्री राणे यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनविभागाचे सिद्धेश गावडे यांनी केले तर आभार वन प्रशिक्षण केंद्राचे विश्वनाथ पिंगुळकर यांनी मानले. कार्यक्रमाला अनेक अधिकारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.
जंगलात गवतासह फळझाडांची लागवड
जंगलात जंगली गवत वाढविण्यावर लक्ष द्यावे, जेणेकरून रानटी गवे ग्रामीण भागात घुसून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करणार नाहीत तसेच जंगलामध्ये आंबा, जांभूळ, पेरू, सीताफळ यांसारखी झाडे लावून त्यांची जलद वाढ सुनिश्चित करणे गरजेचे आहे. या झाडांवरील फळांवर जंगली प्राणी आपली गुजराण करतील आणि त्यामुळे त्यांचा लोकवस्तीतील संचार कमी होईल, असे मंत्री राणे म्हणाले.
माती परीक्षणानंतर झाडांना अन्नद्रव्ये पुखणार
जागतिक हवामान बदल आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पंतप्रधानांच्या 'एक पेड माँ के नाम' या घोषणेनंतर राज्यात पाच लाख झाडे लावली आहेत. यापुढे दहा लाख झाडांची लागवड व त्यांचे संगोपन करण्यावर भर दिला जाणार आहे. जसे लहान मुलांच्या तपासण्या करून योग्य औषधोपचार दिला जातो, त्याप्रमाणे माती परीक्षणामुळे झाडांना योग्य अन्नद्रव्ये पुरविता येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.