भाजपाच्या स्थापनेपासून मुख्यमंत्र्यांच्याही वडिलांचे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 12:31 IST2025-04-06T12:30:53+5:302025-04-06T12:31:38+5:30

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत है गोवा भाजपमध्ये सध्या अत्युच्च पदावर असले, तरी ते सहजासहजी त्या पदावर आलेले नाहीत.

since the establishment of bjp the work of the fathers of the cm pramod sawant has also been done | भाजपाच्या स्थापनेपासून मुख्यमंत्र्यांच्याही वडिलांचे काम

भाजपाच्या स्थापनेपासून मुख्यमंत्र्यांच्याही वडिलांचे काम

सुहास बेळेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत है गोवा भाजपमध्ये सध्या अत्युच्च पदावर असले, तरी ते सहजासहजी त्या पदावर आलेले नाहीत. त्यासाठी गेली अनेक वर्षे ते सातत्याने न थकता कष्ट, परिश्रम करीत आहेत. भाजपमध्ये त्यांच्या रूपाने ही दुसरी पिढी कार्यरत आहे. त्यांचे वडील पांडुरंग सावंत हे त्यांच्यापूर्वीपासून म्हणजे भाजपच्या सुरुवातीपासून भाजपसाठी काम करीत होते.

भाजप हा पूर्वाश्रमीचा जनसंघ होता. गोव्यात या पक्षाने १९७२ साली निवडणूक लढवली होती. पण, त्यांना एकही जागा मिळाली नव्हती. १९७५ च्या आणीबाणीविरोधात काही पक्ष एकत्र येऊन जनता पक्ष स्थापन झाला होता. या पक्षात हा जनसंघ विलीन झाला होता. १९७७ मध्ये जनता पक्षाने गोवा विधानसभेची निवडणूक लढवली. त्यांनी तेव्हा ३० जागा लढवल्या होत्या. यावेळी पांडुरंग सावंत हे जनता पक्षामध्ये आले, तेव्हा त्यांनी तत्कालीन जनता पक्षाच्या उमेदवारासाठी कामही केले.

पणजीतून तेव्हा माधव बीर जनता पक्षातर्फे उभे राहिले होते, तेव्हा पांडुरंग सावंत त्यांच्या प्रचारासाठी आणि पक्षकार्यासाठी पणजीत यायचे. तेव्हा ते पाळी मंडळ अध्यक्ष होते. जरी ते जनता पक्षासाठी काम करीत असले, तरी १९७७ची निवडणूक ते लढले नव्हते. मात्र, १९७७ साली सत्तेवर आलेले शशिकलाताई काकोडकर यांचे सरकार एप्रिल १९७९ मध्ये कोसळले. त्यामुळे निवडणूक घ्यावी लागली. ही निवडणूक ३ जानेवारी १९८० रोजी झाली. पांडुरंग सावंत ही निवडणूक जनता पक्षातर्फे लढले.

यावेळी जनता पक्षाच्या निवडणुकीचे काम पाहण्यासाठी आणि प्रचारासाठी म्हणून मोरारजी देसाई गोव्यात आले होते. म्हापशात त्यांची बैठक झाली होती. या बैठकीस उमेदवार आणि मंडळ अध्यक्ष म्हणून पांडुरंग सावंत उपस्थित राहिले होते. बस स्टँडनजीकच्या सिरसाट लॉजमध्ये ही भेट झाली होती. त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला तो काशिनाथ परब यांच्यामुळे. काशिनाथ परब आणि पांडुरंग सावंत हे बिंबल येथील धंपे माईनवर एकत्र काम करीत होते, तेव्हा त्यांची मैत्री जमली. काशिनाथ परब हे जनता पक्षाचे काम करू लागले. त्यांनी सावंत यांना आपल्याबरोबर जनता पक्षात आणले.

पांडुरंग सावंत जेव्हा निवडणुकीस उभे राहिले, तेव्हा परब त्यांच्या प्रचाराला यायचेच, सत्तरीचे शिवाजी देसाई हेही त्यांच्या प्रचाराला यायचे. तेव्हा उसगाव पुलाच्या अलीकडून पिळगावपर्यंत पाळी मतदारसंघ होता आणि तेव्हाच्या कमी वाहतुकीच्या काळात हा मतदारसंघ खूपच मोठा वाटत होता. त्यामुळे एवढ्या मोठ्या मतदारसंघात घरोघरी फिरणे जवळ जवळ अशक्य होते. तरीही सावंत आपला गाव कोठंबी, साखळी, आमोणे वगैरे भागात मिळेल त्या वाहनाने जायचे. तेथे लोकांना भेटायचे. कुंभारजुवेचे एक परब म्हणून होते, ते त्यांच्याबरोबर जायचे. आमोणे भागात तेच त्यांना घेऊन जायचे. काही काळासाठी त्यांनी कोणाची मोटरसायकलही घेतली होती. त्या दुचाकीवरून ते आमोणे आणि अन्य भागांत जात असत. तिथे काही लोक त्यांचे प्रेमाने स्वागत करीत असत.

६ एप्रिल १९८० रोजी भाजपची स्थापना झाली. गोव्यात भाजपचे तेव्हा काशिनाथ परब पहिले अध्यक्ष झाले. सावंत यांचे ते सहकारी होतेच. तेही भाजपमध्ये गेले, तेव्हापासून सावंत भाजपमध्ये आहेत. अर्थातच त्यांच्या मागोमाग त्यांचे चिरंजीव डॉ. प्रमोद सावंत हेही राजकारणात आले. तेव्हा त्यांच्यासमोर भाजप हाच पक्ष होता. त्याचे काम त्यांनी सुरू केले.

पांडुरंग सावंत हे सुरुवातीच्याच काळात पाळीचे मंडळ अध्यक्ष होते. त्यांचे काम सुरू असतानाच त्यांनी जिल्हा पंचायतीची दुसरी निवडणूक लढवली. त्यात ते विजयी झाले. ही निवडणूक पक्षीय पातळीवर होत नव्हती. पण ते भाजपमध्ये होते. मार्च २००५ मध्ये ही निवडणूक झाली होती. त्यावेळी राज्यात मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री होते.

आमोणे येथे सुभाष हळर्णकर नावाचे एक गृहस्थ प्रेमाने त्यांचे निवडणुकीचे बोर्डही लावायचे, तेव्हा मोठ्या सभा नव्हत्याच. वाड्यांवर छोट्या-छोट्या बैठका घेतल्या जायच्या. पण, या निवडणुकीमुळे ते पाळी भागात सर्वत्र फिरले. त्याचा त्यांना नंतर उपयोग झाला, पण ही निवडणूक ते हरले. त्यांना तेव्हा ३८२ मते पडली होती. या निवडणुकीदरम्यान जनता पक्ष फुटलाच होता. त्यातच निवडणुकीनंतर जनता पक्षातून तेव्हाचा जनसंघ बाहेर आला आणि त्यांनी भारतीय जनता पक्ष स्थापन केला.

झेडपी सदस्य होते...

पांडुरंग सावंत सांगतात, पर्रीकर यांनी प्रथम जिल्हा पंचायतीसाठी निधी सुरू केला. जि. पं. सदस्यांसाठी मानधनही त्यांनीच सुरू केले. त्याआधी काही मिळत नव्हते. सावंत यांनी यानंतर कुठलीच निवडणूक लढवली नाही. पण त्यांचे चिरंजीव भाजपसाठी काम करू लागेपर्यंत ते पक्षासाठी काम करीत होते. या घराला राजकारणाचा वारसा नव्हता. पण पांडुरंग सावंत यांनी तो निर्माण केला आणि त्यांचे चिरंजीव डॉ. प्रमोद सावंत यांनी तो पुढे जोपासला.

 

Web Title: since the establishment of bjp the work of the fathers of the cm pramod sawant has also been done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.