अॅड. राजेश नार्वेकर, निवृत्त अध्यक्ष प्रशासकीय लवाद
'देवा, तू आम्हाला सांभाळ' असे आम्ही म्हणतो, पण 'देवा तू तुला सांभाळून घे' असे एकदा मला म्हणावे लागले होते. २००२ साली म्हापसा सार्वजनिक गणेशोत्सवाचा मी अध्यक्ष होतो. तेव्हा आम्ही सगळ्यांनी नेहमीप्रमाणे मोठ्या उत्साहात उत्सव साजरा केला.
अनंत चतुर्थी दिवशी सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता होते. संध्याकाळी उत्तर पूजा झाल्यावर श्री गणेशाची विसर्जन मिरवणूक निघते. ती मिरवणूक शहराच्या पालिका बाजाराभोवती फिरून खाली सीमेवर जाते. नंतर तेथून तार नदीत मूर्तीचे विसर्जन करण्यात येते. हे सगळे अंतर सुमारे आठ ते दहा किलोमीटर एवढे असावे. त्याकाळी आता जशी सार्वजनिक गणेशाची मूर्ती आणून पूजनाच्या ठिकाणी स्थानापन्न करण्यासाठी व नंतर उत्तर पूजा झाल्यावर पूजनाच्या स्थानावरून रथात, म्हणजे एका ट्रकात विसर्जनासाठी नेण्यासाठी क्रेन वापरतात तशी क्रेन न वापरता १५ ते २० गणेशभक्त मूर्ती उचलून ट्रकात ठेवायचे.
त्यावर्षी अनंत चतुर्थी दिवशी उत्तरपूजा झाली. भटजींनी 'तू सगळ्यांना सांभाळ रे बाप्पा' असे गान्हाणे देवाला घातले. विसर्जनाची तयारी सुरू झाली. मखर, फुले, दिव्यानी सुशोभित केलेला रथ म्हापसा पालिका बाजाराच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर येऊन उभा राहिला. सुमारे १५ गणेशभक्त श्रीगणेशाची मूर्ती पूजनाच्या ठिकाणाहून उचलून रथात चढवण्यासाठी पुढे सरसावले. हळूहळू मूर्ती आपल्या जागेवरून हलवण्यात येऊ लागली. मी त्यावेळी बाजाराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उभा राहून न्याहाळत होतो. इतक्यात मूर्ती उचलणारा एक इसम माझ्याजवळ धावत आला व मला बाजूला नेले व हळूवारपणे सांगितले की मूर्ती जागेवरून हलवण्यासाठी जे गणेशभक्त गणेशाच्या मूर्तीकडे मंचावर जमलेत त्यापैकी एकजण मूर्तीच्या एका हातावर अनवधानाने आदळला व श्री गणेशाच्या त्या खांद्यावर तडा गेला आहे व एक हात थोडासा हलल्यासारखा दिसतो. ते ऐकताच मी धास्तावलो.
उत्सव उत्तमपणे साजरा केल्याची पावती अनेक गणेशभक्तांनी प्रत्यक्ष भेटून दिली होती आणि नेमकं विघ्नहर्त्याच्या विसर्जनावेळी विघ्न आले. पण साक्षात बलशाली महागणपती समोर असताना मी हतबल कसा होईन? त्या गणेशभक्ताला मी म्हणालो, 'तू हे कुणाला सांगू नकोस. मूर्ती रथातून विसर्जनासाठी नेताना मूर्तीच्या त्या हाताजवळ बस व तो हात जास्त हलायला लागला किंवा निखळेल असे वाटल्यास मला सांग. मी रथासोबत रस्त्यावरून चालत येतो. तो गणेशमूर्तीकडे जायला निघाला तेव्हा न जाणे मला काय झाले, नकळत माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले. मी त्या गणेशभक्ताला म्हणालो, 'तुही काळजी करू नकोस, फक्त मूर्तीची काळजी घे. देव सगळ्यांना सांभाळून घेतो. तो स्वतःलाही सांभाळेल!'
मी मनातल्या मनात म्हणालो देवा, इतके दिवस तू आम्हाला सांभाळलेस. याक्षणी तू तुला सांभाळ रे बाप्पा! मी श्री गणेशाच्या नयनाला नेत्र भिडवले. त्या विघ्नहर्त्याकडे पाहून प्रणाम केला आणि निर्विघ्नपणे देवाचे विसर्जन होईल असा आश्वासक विश्वास माझ्या मनात तयार झाला. विसर्जनाच्या मिरवणुकीस सुरुवात झाली. त्यावर्षीही म्हापसा शहर जरी गणेशमय झाले होते तरी रस्ते 'खड्डेमय'च होते. रथ सावकाश जात होता तरी रस्त्यावरील खड्यांमुळे गचके खात होता व श्री गणेशाची मूर्ती हलत होती. मिरवणूक तार नदीजवळ आली. त्यावेळी परत गणेशभक्तांनी रथावरून उचलून मूर्तीला नदीजवळ नेले. आरती झाल्यावर श्री गणेशाच्या अंगावरील फुले, दुर्वा काढून बाजूला ठेवली व गणेशाची मूर्ती विसर्जित करण्याकरिता नदीत नेली. नेमके त्याचवेळी मला आढळले की श्रींच्या गळ्यातील सुताचे जानवे तसेच होते व त्या जानव्याची दुसरी बाजू ज्या हाताच्यावर खाकेत मूर्तीला तडा गेला त्या हातात गुंडाळली गेली होती. पाहाताना असे वाटले की श्री गणरायाच्या गळ्यातील जानव्यामुळे खाकेत पडलेला तडा रुंदावला नव्हता व हात मूर्तीशी एकसंघ राहिला होता.
पडताळणी करावी म्हणून मी मला मूर्तीला तडा गेल्याचे सांगायला जो गणेशभक्त आला होता त्याला मी विचारले की सावधगिरीचा उपाय म्हणून त्याने श्रींच्या गळ्यातील जानवे त्या ढासळण्याची शक्यता असलेल्या हाताला गुंडाळले होते का? तर त्याने ती गोष्ट नाकारली. मला सांगा गळ्यातील जानवे हाताला गुंडाळण्याचे कार्य कुणी बरे केले असावे? त्या बारीक सुताच्या जानव्याच्या आधारावर महागणपतीचा हात न हलता न ढासळता राहाणे शक्यच नव्हते. हाताच्या वजनाने ते जानवे तुटणे साहजिकच होते. तसे झाल्यास हातही अभंग राहिला नसता. गणेशभक्तांची श्री गणरायावरील 'अतूट श्रद्धा' व 'अभंग' भक्तीमुळेच ते बारीक सुताचे जानवे अतूट बनले होते की सिद्धीविनायकाने आपल्या दैवी सामर्थ्याने ही मूर्ती 'अभंग' राखली होती, हे मी आजही सांगू शकत नाही. तुम्हाला काय वाटते?