On the seventh day, the panaji fled for water, demonstrations outside the bungalow of her chief minister | सातव्या दिवशीही पणजी पाण्यासाठी तळमळली, आपची मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर निदर्शने
सातव्या दिवशीही पणजी पाण्यासाठी तळमळली, आपची मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर निदर्शने

पणजी : नळ कोरडेच असल्याने सलग सातव्या दिवशी राजधानी पणजीतील लोक पिण्याच्या पाण्यासाठी तळमळले. सलग सात दिवस पणजी शहर कधीच पाण्यावीना राहिले नव्हते. सरकारची पूर्ण असंवेदनशील वृत्ती पाणी टंचाईच्या काळात दिसून आली. आम आदमी पक्षाच्या कार्यकत्र्यानी रिकाम्या बादल्या घेऊन बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानाबाहेर निदर्शने 
केली.

गेल्या शनिवारपासून सरकार उद्या पाणी येईल असे सांगते. दर दिवशी उद्या पाणी येईल असे सांगून लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सार्वजनिक बांधकाम खातेही करत आहे. घरातही पाणी नाही व शाळेतही पाणी नाही अशी स्थिती असल्याने पणजीतील अनेक मुले विद्यालयालाही जाऊ शकत नाहीत. बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळालाही मोठा फटका बसला आहे. काही लोकप्रतिनिधी लपून राहिले आहेत. पणजीतील अनेक लोकांनी स्वत:चे फ्लॅट बंद केले व ते मूळगावी गेले. ते अजून परतलेले नाहीत. बुधवारी पहाटे पाच वाजता पाणी नक्कीच पणजीला पोहचेल असे बांधकाम मंत्री दीपक प्रभू पाऊसकर यांनी जाहीर केले होते पण बुधवारी रात्रीपर्यंतही लोकांच्या घरी पाणी पोहोचले नाही.

खांडेपार- फोंडा येथे जलवाहिनी दुरुस्तीचे काम बुधवारी सव्वा अकरा वाजता पूर्ण झाले. लोखंडी जलवाहिनीच्या तुकडय़ांना वेल्डिंग करणे आणि बाजूला सिमेंटचे बांधकाम करणो अशी प्रक्रिया सकाळी अकरानंतर पूर्ण झाली. त्यानंतर कमी दाबाने थोडे पाणी सोडून जलवाहिनीची तपासणी करण्यात आली. मंत्री पाऊसकर यांनी बुधवारी सायंकाळी लोकमतला सांगितले, की पाणी आल्तिनो येथील टाकीत पोहोचले आहे. तथापि, पाणी आज गुरुवारीच सकाळी लोकांच्या घरी पोहचेल.

आपचे नेते वाल्मिकी नायक, प्रदीप पाडगावकर व अन्य कार्यकर्त्यांनी मिळून आल्तिनो येथे प्रातिनिधिक स्वरुपाचे आंदोलन केले. रिकाम्या बादल्या घेऊन आपच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या अंसेवदनशीलतेचा निषेध केला. आल्तिनो येथे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या शासकीय बंगल्याबाहेर आपचे कार्यकर्ते गोळा झाले. कार्यकर्त्यांची संख्या कमी होती पण पोलिसांची संख्या जास्त होती. तथापि, सरकार पाणी पुरवठा करण्याबाबत रोज नवी तारीख देऊन लोकांची मोठी फसवणूक करत आहे, पणजीवासीयांच्या जखमांवर मुख्यमंत्रीही मीठ चोळत आहेत, अशी टीका नायक यांनी केली. कोणतेही फालतू सरकार जरी अधिकारावर असते तरी त्या सरकारने जलवाहिनी फुटण्याच्या घटनेबाबत निदान चौकशीचा आदेश दिला असता. मुख्यमंत्री सावंत यांनी मात्र असा आदेश देखील देण्याचे सौजन्य दाखविले नाही. सरकारला लोकांचे काहीच पडून गेलेले नाही. या वृत्तीचा आम्ही निषेध करतो, असे नायक म्हणाले.

पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात हे मुंबईला जाऊन बसले आहेत. बांधकाम खात्याकडे टँकरच नाहीत, पण काही टँकर बाबूश मोन्सेरात यांच्या कार्यालयाला मात्र उपलब्ध झाले आहेत. याबाबतही चौकशी व्हायला हवी, असे नायक म्हणाले. पणजीत लोकांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव केल्यामुळे भाजप सरकार आता पणजीवासीयांवर सूड उगवत आहे काय, असा प्रश्न नायक यांनी केला.


Web Title: On the seventh day, the panaji fled for water, demonstrations outside the bungalow of her chief minister
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.