गोव्यात मंगळवारपासून विज्ञान चित्रपट महोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 22:34 IST2018-01-12T22:34:20+5:302018-01-12T22:34:30+5:30
विज्ञान परिषद-गोवातर्फे येत्या १६ ते १९ या काळात तिस-या भारतीय विज्ञान चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

गोव्यात मंगळवारपासून विज्ञान चित्रपट महोत्सव
पणजी : विज्ञान परिषद-गोवातर्फे येत्या १६ ते १९ या काळात तिस-या भारतीय विज्ञान चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हॉलिवूडचे विज्ञानावर आधारित सात व भारतीय एक मिळून आठ चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित केले जातील. गोव्यासह शेजारी सिंधुदुर्गमधील मिळून १0 हजारांहून अधिक विद्यार्थी याचा लाभ घेतील.
पत्रकार परिषदेत विज्ञान परिषदेचे अध्यक्ष सुहास गोडसे व मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तालक यांनी ही माहिती दिली. मनोरंजन संस्था, राज्य सरकारचे विज्ञान आणि तंत्रज्ञान खाते, गोवा विज्ञान केंद्र, नॅशनल सेंटर फॉर अॅटार्क्टिक यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे १00 विद्यालयांमध्ये भेट देऊन विद्यार्थ्यांशी या चित्रपट महोत्सवाबद्दल संवाद साधलेला आहे. यंदा या चित्रपट महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे विज्ञानाधारित चित्रपट निर्मितीच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तालक म्हणाले की, २0१६ साली हा चित्रपट महोत्सव सुरू झाला तेव्हा ६९ विद्यालयांमधून ५ हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. संशोधक व निर्माते यांच्यात संवाद घडवून आणण्यासाठी चांगले व्यासपीठ महोत्सवानिमित्त उपलब्ध झाले आहे.
अनंत नारायण यांचे एअरो मॉडेलिंग शोवर व्याख्यान असेल. या शिवाय रोबोटिक स्पर्धा, फॅबलॅब शो हे खास आकर्षण असेल. महोत्सवात प्रदर्शित करण्यात येणारे सात विज्ञानाधारित चित्रपट अमेरिकेचे तर एक तामिळी आहे. अॅड्रोमेडा स्ट्रेन ( थ्रिलर), आइस एज : कोलिजन कोर्स (अॅनिमेशन, अॅडव्हेंचर), २0१0 (अॅडव्हेंचर), लाइफ (थ्रिलर, हॉरर), अॅरायव्हल (ड्रामा), कोअर (अॅक्शन, अॅडव्हेंचर), अॅबिस (१९८९) (अॅडव्हेंचर) हे अमेरिकेचे तर २४ हा भारतीय तामीळ चित्रपटही प्रदर्शित केला जाणार आहे. आयनॉक्स १ व आयनॉक्स २ या स्क्रीनवर हे चित्रपट प्रदर्शित केले जातील. ५ शास्रज्ञ यावेळी उपस्थित असतील. तसेच पुणे येथील एनसीसीएसचे शेखर पांडे व इतरांची खास उपस्थिती असेल. मालवण येथून काही विद्यार्थी या चित्रपट महोत्सवात भाग घेतील तसेच निपाणी येथून काही शिक्षकही येतील, असे सांगण्यात आले.