शाळकरी मुलीवर युवकाचा सुरीहल्ला
By Admin | Updated: January 5, 2016 02:07 IST2016-01-05T02:07:17+5:302016-01-05T02:07:34+5:30
फोंडा : ख्रिश्चनवाडा-माशेल येथून हायस्कूलमध्ये जाणाऱ्या आठवीतील विद्यार्थिनीवर सोमवारी एका युवकाने सुरीहल्ला केला.

शाळकरी मुलीवर युवकाचा सुरीहल्ला
फोंडा : ख्रिश्चनवाडा-माशेल येथून हायस्कूलमध्ये जाणाऱ्या आठवीतील विद्यार्थिनीवर सोमवारी एका युवकाने सुरीहल्ला केला. सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने माशेल परिसरात खळबळ उडाली. संशयित युवकाला फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतले असता तो मनोरुग्ण असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. एल्स्टन स्टिवन टोरिस (रा. सांत इस्तेव्ह) असे त्याचे नाव असून त्याची रवानगी मनोरुग्णालयात केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, सोमवारी सकाळी पीडित मुलगी आपल्या मैत्रिणींसमवेत शाळेत निघाली असता, वाटेत दबा धरून बसलेल्या संशयिताने तिच्यावर हल्ला केला. अचानक घडलेल्या या प्रकाराने बावरलेल्या परिस्थितीत तिने प्रतिकार केला. मात्र, तिच्या हाताला व दंडाला जखमा झाल्या. तिने त्याच स्थितीत शाळेकडे धाव घेऊन शिक्षकांना झाल्या प्रकाराची माहिती दिली. मागाहून मुलीचे वडील तसेच शाळेच्या पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष रघुवीर फडते व उपाध्यक्षा ज्योत्स्ना शिरोडकर, खजिनदार विनय गावकर, तसेच तिवरे-वरगाव पंचायतीचे सरपंच फ्रान्सिस लोबो आणि शाळेतर्फे शिक्षक नंदा भगत यांनी फोंडा पोलिसांत तक्रार दाखल केली. मागाहून फोंडा पोलिसांनी संशयिताला शोधून काढून ताब्यात घेतले.
निरीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजय धुरी तपास करत आहेत. (प्रतिनिधी)