राज्यात ओला इलेक्ट्रिक बाइकची विक्री स्थगित; वाहनधारकांची तक्रार, वाहतूक खात्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 10:26 IST2025-11-01T10:26:08+5:302025-11-01T10:26:50+5:30
ओला दुचाकीधारकांनी खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

राज्यात ओला इलेक्ट्रिक बाइकची विक्री स्थगित; वाहनधारकांची तक्रार, वाहतूक खात्याचा निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :ओला इलेक्ट्रिक बाइक संदर्भातील समस्या सुटेपर्यंत राज्यात या बाइकची विक्री स्थगित करण्याचा निर्णय वाहतूक खात्याने घेतला आहे. ओला दुचाकीधारकांनी शुक्रवारी या खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
याबाबत वाहतूक संचालक प्रविमल अभिषेक यांनी या कंपनीचा नवीन वाहन विक्रीचा परवाना समस्यांचे निराकरण करेपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. तसेच ऑनलाइन नोंदणीवरसुद्धा बंदी घालण्यात येत असल्याचे वाहनधाकरांना सांगितले. गेल्या काही वर्षात राज्यातील ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर ओला इलेक्ट्रिक बाइक्स खरेदी केल्या असून, बहुतांश बाइक्स नादुरुस्त आहेत. त्या दुरुस्तीविना कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये पडून आहेत. कंपनी त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याने बाइक संदर्भातील समस्या सुटेपर्यंत राज्यात या बाइकची विक्री बंद करावी, अशी मागणी या वाहनधारकांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. काही दिवसांपूर्वी त्यासाठी आंदोलनही करून मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते.
बाइक मालक धर्मा नाईक म्हणाले, "राज्यात सुमारे २० हजार ओला इलेक्ट्रिक बाइक्स असून, बहुतेक नादुरुस्त आहेत. या कंपनीचे अगोदर पाच ते सहा शोरूम होते. मात्र, ते सर्व बंद झाले असून, केवळ वेर्णा येथील त्यांचे सर्व्हिस सेंटर आहे. त्याच्याबाहेर मोठ्या संख्येने या बाइक्स दुरुस्तीअभावी पडून आहेत. काही बाइक्स तर पाचहून अधिक महिने तशाच पडून असून, दुरुस्तीसाठी त्या ठिकाणी मॅकेनिक तसेच अन्य यंत्रणा नाही.
दरम्यान, ओला बाइक्सविरोधात बाइक मालकांनी साखळीत आंदोलन केल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्याची दखल घेतली. त्यानंतर ओला कंपनीचे तांत्रिक पथक अन्य राज्यांतून गोव्यात दाखल झाले. त्यांनी दुरुस्ती सुरू असल्याचे सांगितले होते.