गोव्यात लॉकडाऊनमध्येही ‘गृहनिर्माण’ची भूखंड विक्री, आपचे मुख्यमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 22:20 IST2020-04-27T22:14:58+5:302020-04-27T22:20:06+5:30
'व्यावसायिक कामे बंद आहेत. अशावेळी सार्वजनिक मालमत्ता विक्रीस काढणे चुकीचे आहे.'

गोव्यात लॉकडाऊनमध्येही ‘गृहनिर्माण’ची भूखंड विक्री, आपचे मुख्यमंत्र्यांना पत्र
पणजी - लॉकडाऊन असतानाही गोवा गृहनिर्माण मंडळाने भूखंड विक्री चालूच ठेवली असल्याचा आरोप करणारे व यात हस्तक्षेपाची मागणी करणारे पत्र आम आदमी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रदीप पाडगांवकर यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना लिहिले आहे.
'गेल्या २३ रोजी गृहनिर्माण मंडळाने भूखंड विक्रीस काढणारी सूचना जारी केली आहे. लॉकडाऊनच्या काळात केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या व्यवहारालाच परवानगी आहे. भूखंड विक्री जीवनावश्यक यादीत येत नाही किंवा केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्येही या गोष्टीला मुभा दिलेली नाही. लॉकडाऊनमुळे लोक घरात किंवा हद्दी बंद असल्याने राज्याबाहेर अडकून पडलेले आहेत' असं पाडगांवकर यांनी पत्रात म्हटलं आहे.
व्यावसायिक कामे बंद आहेत. अशावेळी सार्वजनिक मालमत्ता विक्रीस काढणे चुकीचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचा भंग करणारे हे कृत्य आहे. विशेष म्हणजे गृह निर्माण मंडळाच्या संकेतस्थळावर याबद्दल कोणतीही माहिती नाही. घाईने हे भूखंड विकले जात असल्याने गैरव्यवहारांचा संशय घेण्यास वाव आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करुन ही नोटीस मागे घ्यावी, अशी मागणी पाडगांवकर यांनी केली आहे.