सदानंद तानावडे झाले खासदार! राज्यसभा बिनविरोध निवडीचे पत्र प्रदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 16:09 IST2023-07-19T16:08:52+5:302023-07-19T16:09:29+5:30
मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

सदानंद तानावडे झाले खासदार! राज्यसभा बिनविरोध निवडीचे पत्र प्रदान
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना राज्यसभा खासदारपदी बिनविरोध निवड झाल्याचे पत्र मंगळवारी प्रदान करण्यात आले.
गोव्यात राज्यसभेसाठी एक जागा आहे. या एका जागेसाठी भाजपतर्फे तानावडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आला होता. विरोधी सातही आमदारांनी उमेदवार न देण्याचा निर्णय संयुक्तपणे घेतला. त्यामुळे तानावडे यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. १७ रोजी माघारीसाठी मुदत होती. त्यानंतर मंगळवारी तानावडे यांना बिनविरोध निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.
गोव्यात राज्यसभा खासदारपदी बिनविरोध निवडून आलेले तानावडे हे पहिले खासदार ठरले आहेत तर राज्यसभेवर जाणारे भाजपचे दुसरे प्रदेशाध्यक्ष ठरले आहेत. याआधी माजी प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर राज्यसभेवर गेले होते. गेल्या कार्यकाळात ते खासदार होते. तानावडे यांची राजकीय कारकीर्द पंच सदस्य ते आमदार व आता राज्यसभा खासदार अशी आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तानावडे यांचे अभिनंदन करताना विरोधी आमदारांनी उमेदवार न दिल्याने त्यांचे आभार मानले आहेत.