गोव्यात रशियन महिलेचा विनयभंग, संशयिताला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 17:19 IST2017-11-29T17:18:29+5:302017-11-29T17:19:00+5:30
विदेशी महिला पर्यटकांसाठी आता गोवा सुरक्षित राहिलेला नाही. दक्षिण गोव्यातील बेताळभाटी समुद्रकिना-यावर रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेउन एका 32 वर्षीय रशियन महिलेचा विनयभंग करण्याची घटना सोमवारी रात्री घडली.

गोव्यात रशियन महिलेचा विनयभंग, संशयिताला अटक
मडगाव : विदेशी महिला पर्यटकांसाठी आता गोवा सुरक्षित राहिलेला नाही. दक्षिण गोव्यातील बेताळभाटी समुद्रकिना-यावर रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेउन एका 32 वर्षीय रशियन महिलेचा विनयभंग करण्याची घटना सोमवारी रात्री घडली. कोलवा पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावताना संशयिताच्या मुसक्या आवळल्या आहे, वेलेंतिनो काव्र्हालो (28) असे या संशयिताचे नाव असून, तो मूळ माजोर्डा येथील रहिवाशी आहे.
भादंवि 354 व 392 कलमाखाली संशयितावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पोलीस निरीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना 24 तासात संशयिताला अटक केली. सोमवारी रात्री तक्रारदार रशियन महिला कोलवा येथून बेताळभाटी किना-यावर गेली होती. संशयित तिच्या मागावर होता. रात्री किना-यावर अंधाराचा गैरफायदा उठवून संशयिताने तिचा विनयभंग केला व तिचे पर्स हिसकावून पळ काढला. पर्समध्ये दीड हजारांची रोकड, मोबाईल संच, कॅमेरा व अन्य कागदपत्रके होती. मागाहून त्या महिलेने कोलवा पोलीस ठाणो गाठून तक्रार नोंदविली.
तक्रारदाराने संशयिताचे केलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी शोध काम सुरु करुन नंतर त्याला अटक केली. चोरीला गेलेला ऐवजही जप्त करण्यात आला. तो केपे तालुक्यातील पारोडा येथे रहात आहे. पुढील पोलीस तपास चालू आहे.