तीन शाळकरी मुलांच्या अपहरणाच्या अफवेने शेल्डेत खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 17:30 IST2023-11-29T17:30:21+5:302023-11-29T17:30:55+5:30
पेडामळ येथे एका व्हॉट्सॲप ग्रुपवरून तीन शाळकरी मुलांचे अपहरण झाल्याचा ऑडिओ व्हायरल झाला.

तीन शाळकरी मुलांच्या अपहरणाच्या अफवेने शेल्डेत खळबळ
ख्रिस्तानंद पेडणेकर
केपे : पेडामळ - शेल्डे येथे तीन मुलांच्या अपहरणाच्या अफवेमुळे शेल्डे पंचायत क्षेत्रात बुधवारी खळबळ उडाली. पेडामळ येथे एका व्हॉट्सॲप ग्रुपवरून तीन शाळकरी मुलांचे अपहरण झाल्याचा ऑडिओ व्हायरल झाला. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण होते. त्यानंतर स्थानिक केपे पोलिसांनी या प्रकाराबद्दल खुलासा करत ही अफवा असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पालकांचा जीव भांड्यात पडला.
एका व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रसारित झालेल्या ऑडिओमुळे पेडामळ, शिरवई परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. जो ऑडिओ व्हायरल झाला होता, त्यामध्ये बोरीमाळ क्रीडा संकुलामध्ये शाळेच्या क्रीडांगणावर जी मुले सराव करीत आहेत, तेथून तीन शाळकरी मुलांचे अपहरण केले गेल्याचे म्हटले होते. अपहरणाबाबतचा ऑडिओ व्हायरल झाल्यामुळे पालकांनी शाळेकडे धाव घेतली.
याबाबत स्थानिक पंच दीप्ती नाईक म्हणाल्या की, मी पोलिसांकडे चौकशी करून असा काहीच प्रकार घडलेला नाही याची खात्री करून घेतली. पालकांनाही माहिती दिली आहे. सोशल मीडियातील अफवेमुळे गावातील इतर पालकही धास्तावले. काही पालकांनी गावातील शाळेत जावून शिक्षकांकडे विचारपूस केली. आम्हाला या पालकांची समजूत घालावी लागली.
केपे पोलिस स्थानकाचे निरीक्षक दीपक पेडणेकर म्हणाले की, या प्रकारामध्ये कुठलेही तथ्य नाही. केपे परिसरात किंवा या क्षेत्रामध्ये असा प्रकार घडलेला नाही. जो ऑडिओ व्हायरल झाला होता, तसेच काहीच घडलेच नाही. याबद्दल कोणाचीही तक्रारही आलेली नाही. गावातील एका व्हाट्सॲप ग्रुपमध्ये हा मेसेज प्रसारित झाल्याचे दिसते. गावातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
गाव वारंवार होते व्हायरल...
पेडामळ, शिरवई गावातील काही परिसर शेल्डे - कुडचडे मतदारसंघात तर काही परिसर केपे मतदारसंघात येतो. यापूर्वी बेकायदेशीर बांधकामांच्या प्रकरणांमुळे हे गाव वादग्रस्त बनले आहे. या बांधकामांवर अनेकदा केपे नगरपालिका तसेच शेल्डे पंचायतीकडून कारवाई करण्याचे प्रकारही घडतात. त्याविषयीची माहिती व्हाट्सॲप ग्रुपवर वारंवार दिली जाते. त्यामुळे सोशल मीडियावर हा परिसर आधीच प्रसिद्ध झाला आहे.