वादळी पावसाच्या तडाख्याने भात भुईसपाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 12:21 IST2025-10-25T12:20:35+5:302025-10-25T12:21:30+5:30
कापणीस तयार भात पीक अक्षरशः भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

वादळी पावसाच्या तडाख्याने भात भुईसपाट
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: हवामान खात्याने व्यक्त केलेला अंदाज सार्थ ठरवत काल, शुक्रवारी राज्यात पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली. राजधानी शहरात दिवसभर ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. तर सत्तरी, फोंडा, शिरोडा, काणकोण या तालुक्यांना पावसाचा तडाखा बसला आहे. कापणीस तयार भात पीक अक्षरशः भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
पणजीत सकाळी संततधार पाऊस झाला. थोड्या विश्रांतीनंतर दुपारी व सायंकाळी, आणि रात्री पुन्हा पावसाने हजेरी लावली.
धारबांदोडा, बार्देश, पेडणेला झोडपले
राज्यात गेल्या चोवीस तासांत सरासरी ८.५ मिलिमीटर (मिमी) पावसाची नोंद झाली. यात धारबांदोडा येथे सर्वाधिक १६.४ मिमी पाऊस पडला. तर पणजीत सर्वात कमी ०.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
याशिवाय म्हापशात १३.४ मिमी, पेडणेत १२.८ मिमी, जुने गोवा ५.६ मिमी, साखळीत १३ मिमी, फोंड्यात ८.० मिमी, काणकोणमध्ये ५.२ मिमी, दाबोळीत ७.२ मिमी, मुरगावमध्ये ५.६ मिमी, व सांगेत ५.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
काणकोण, फोंडा, शिरोड्यात पिकांचे मोठे नुकसान
दरम्यान, काही दिवसांपासून पडणाऱ्या या पावसामुळे फोंडा, शिरोडा भागात उशिरा लागवड केलेल्या भातशेतीला फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे पीक कापणीसाठी तयार आहे. मात्र, पावसामुळे पीक आडवे पडले आहे. अनेक शेतकऱ्यांची मेहनत वाया गेली आहे. सध्या पीक कापणीसाठी तयार आहे. मात्र पावसामुळे त्याची कापणी करणे शक्य नाही.
काणकोण तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी उभे असलेले पीक आडवे पडून त्यावर पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी कापणीची कामे खोळंबली आहेत. धान्याला बुरशी व माती लागण्याची भीती आहे.
रविवारपर्यंत यलो अलर्ट
राज्यात रविवारपर्यंत (दि. २६) हवामान खात्याने यलो अर्लट जारी केला आहे. यादरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वाऱ्याचा वेग ताशी ३५ ते ५५ किमीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यातून समुद्रात वातावरण अस्थिर राहू शकते. मच्छीमारांनी या कालावधीत समुद्रात मासेमारीसाठी उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. कदाचित दि. २८ पर्यंत अशी स्थिती कायम राहू शकते असेही हवामान खात्याने म्हटले आहे.