'आरजी' २७ मतदारसंघ स्वबळावर लढणार: परब; २०२७ च्या निवडणुकीतही इंडिया अलायन्सपासून दूरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 12:29 IST2025-04-01T12:27:45+5:302025-04-01T12:29:10+5:30

२६ ते २७ मतदारसंघ स्वबळावर लढणार असल्याचे परब यांनी सांगितले.

rg will contest 27 constituencies on its own said manoj parab | 'आरजी' २७ मतदारसंघ स्वबळावर लढणार: परब; २०२७ च्या निवडणुकीतही इंडिया अलायन्सपासून दूरच

'आरजी' २७ मतदारसंघ स्वबळावर लढणार: परब; २०२७ च्या निवडणुकीतही इंडिया अलायन्सपासून दूरच

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'तत्त्वे, विचारधारा, स्थिरता नसलेल्या इंडिया अलायन्सपासून भविष्यातही आरजी दूर राहील, असे आरजीचे पक्षप्रमुख मनोज परब यांनी स्पष्ट केले तसेच २०२७ च्या विधानसभा निवडणुकीतही आपला पक्ष विरोधी पक्षांसोबत इंडिया अलायन्समध्ये नसेल, हे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. २६ ते २७ मतदारसंघ स्वबळावर लढणार असल्याचे परब यांनी सांगितले.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, 'इंडिया अलायन्समधील नेते आपापसांतच भांडत आहेत. ही आघाडी घटना, धर्म किंवा गोवा वाचवण्यासाठी नव्हे, तर स्वार्थासाठी स्थापन झालेली आहे. त्यांच्यासोबत जाऊन आम्हाला आमचा वेळ वाया घालवायचा नाही.'

अमित पालेकर यांना दिले आव्हान

आम आदमी पक्षाचे गोवा प्रमुख अॅड. अमित पालेकर यांचाही परब यांनी समाचार घेतला. गोव्यात विरोधकांमधील युतीच्या बाबतीत अन्य विरोधी पक्षांना अक्कलशून्य म्हणणारे पालेकर यांनी दिल्लीत केजरीवाल यांनी युती का केली नाही, हे आधी सांगावे, असे परब म्हणाले. चिंबलमध्ये ५० हजार चौ. मि. जमिनीत अतिक्रमण करून परप्रांतीय स्थलांतरितांनी बेकायदा बांधकामे उभारली आहेत, ती पाडून तेथील परप्रांतीयांची मतदार ओळखपत्रे रद्द करावीत. पालेकर यांनी या कामासाठी आमच्यासोबत येऊन आम्हाला साथ द्यावी. आम्ही विरोधकांसोबत युती करायला तयार आहोत, असे आव्हान परब यांनी दिले. परब म्हणाले की, मालमत्तेच्या बाबतीत आपल्यावर खोटे आरोप केले जात आहेत.
 

Web Title: rg will contest 27 constituencies on its own said manoj parab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.