गोव्यातील जमिनी हडप करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरजी: मनोज परब
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 13:00 IST2025-12-10T13:00:21+5:302025-12-10T13:00:50+5:30
हरमलमधून जेसिंडा डिसोझा यांचा उमेदवारी अर्ज सादर

गोव्यातील जमिनी हडप करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरजी: मनोज परब
लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे: गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी आणि सध्या मोठ्या प्रमाणात गोव्यात येणाऱ्या परराज्यातील उद्योजक आणि नागरिक मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर डोंगर विकत घेऊन डोंगर कापणी करून पर्यावरणाचा ऱ्हास करत आहेत. स्थानिकांच्या जमिनी विकत घेण्याची ही त्यांची मजल रोखण्यासाठी आणि गोमंतकीयांच्या जमिनी त्यांच्याच हातात सुरक्षित ठेवण्यासाठी आरजी पक्ष महत्त्वाचा ठरणार आहे, असे आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी सांगितले.
हरमल जिल्हा पंचायत मतदारसंघातून जेसिंडा डिसोझा यांचा उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी तोरसे मतदारसंघाचे उमेदवार नारायण शिरोडकर हेही उपस्थित होते. परब पुढे म्हणाले की, गावागावात मेगा प्रकल्प उभे राहात आहेत. गोमंतकीयांना बाजूला टाकण्याचे काम काहीजण करत आहेत. त्यामुळे जनतेचा आता फक्त आरजीवरच विश्वास राहिला आहे.
पेडणेवासी आरजीवर विश्वास दाखवावा, असे त्यांनी आवाहन केले. उमेदवार जेसिंडा डिसोझा यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, हरमल मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत राहणार आहेत. तसेच पक्षाने आपल्यावर दाखविलेला विश्वास लोक विकासासाठी सार्थ ठरविणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.