लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: अवकाळी पावसाने काणकोणसह दक्षिण गोव्याला गुरुवारी वादळासह जोरदार तडाखा दिल्यानंतर आज, शुक्रवारीही जोर कायम राहिला. पुढील तीन दिवस राज्यात पावसाचे थैमान सुरूच राहणार असल्याचे संकेत हवामान खात्याच्या अंदाजावरून मिळत आहेत. आजपासून २५ मेपर्यंत सलग तीन दिवस राज्यात रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे.
गुरुवारी उत्तररात्रीपर्यंत पावसाने राज्याला झोडपून काढले. विशेषतः दक्षिण गोव्यात वादळीवाऱ्यासह जोरदार सरी कोसळल्या. वादळामुळे घरांची मोडतोड झाली. येडा देवीमळ येथील सुमित्रा देऊ गावकर हिचे घर कोसळले. किनारपट्टी भागातही वादळामुळे मोठी हानी झाली आहे. होड्या ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या छोट्या झोपड्या वाऱ्यामुळे उडून जाण्याचे अनेक प्रकार आगोंदा-साळेरी या भागात घडले आहेत.
हवामान खात्याकडून २३ ते २५ मे पर्यंत ३ दिवस राज्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे डीप्रेशनमध्ये रुपांतर होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज खात्याने वर्तविला आहे.
मच्छीमारांना सूचना
मासेमारीवर अद्याप बंदी लागू झाली नसली तरी सध्या परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे समुद्रात मासेमारीसाठी मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये, असा इशारा देण्यात आला आहे. ऊंच लाटा किनाऱ्याला आदळत आहेत. समुद्र अजूनही अधिक खवळण्याची शक्यता आहे.
शेती पाण्याखाली
अवकाळी पावसामुळे केपे, सांगे भागात मोठ्या प्रमाणावर शेत जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. या जमिनीत पावसाळी पीक घेतले जाते. जून महिन्यात त्या लागवडीखाली आणल्या जातात. परंतु त्यापूर्वी त्या पाण्याखाली जाणे हे भातपीकासाठी मारक आहे.