रवी नाईक गेले, आता नवीन मंत्री कोण? नीलेश काब्राल, मायकल लोबो, संकल्प आमोणकरांना संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 07:37 IST2025-10-16T07:36:48+5:302025-10-16T07:37:43+5:30
रवींच्या निधनाने मंत्रिपदाची एक जागा रिकामी झाली आहे.

रवी नाईक गेले, आता नवीन मंत्री कोण? नीलेश काब्राल, मायकल लोबो, संकल्प आमोणकरांना संधी
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : रवी नाईक यांच्या निधनाने मंत्रिमंडळातील एक जागा रिक्त झाल्याने मंत्रिपदी आता कोणाची वर्णी लागते, यावरून चर्चाना उधाण आले आहे. निलेश काब्राल, मायकल लोबो किंवा संकल्प आमोणकर यांना संधी मिळू शकते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी चतुर्थी तोंडावर असताना रमेश तवडकर व दिगंबर कामत या दोघांना मंत्रिमंडळात घेतले होते. त्यामुळे आता एवढ्यात मंत्रिमंडळ फेररचना होणार नाही, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु रवींच्या निधनाने मंत्रिपदाची एक जागा रिकामी झाली आहे.
भाजपने दोन वर्षापूर्वी आलेक्स सिक्वेरा यांची वर्णी लावण्यासाठी निलेश काब्राल यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लावला. आता सिक्वेरा हेही मंत्रिपदी नाहीत. परंतु चतुर्थीच्या आधी झालेल्या मंत्रिमंडळ फेररचनेत काब्राल यांना डावलण्यात आले. आता रवींच्या जागी त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले जाते का, हे पहावे लागेल. भाजपमध्ये काही जण काब्राल यांनी त्यावेळी पक्षाचा आदेश मानून राजीनामा दिल्याने त्यांना मंत्रिमंडळात सामावून घेतले जावे या मताचे आहेत.
दुसरीकडे सप्टेंबर २०२२ मध्ये काँग्रेसचे जे आठ आमदार फुटून भाजपात आले, त्यातील दोघांनाच आतापर्यंत मंत्रिपद मिळालेले आहे. सिक्वेरा यांचाही चतुर्थीच्या आधी राजीनामा घेण्यात आला. त्यामुळे फुटीर गटातील दिगंबर हे सध्या एकमेव मंत्री आहेत. मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांना लवकरच चांगली बातमी मिळणार, असे त्यांच्या वाढदिनी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे संकल्प यांची मंत्रिपदी वर्णी लागते का? हे पहावे लागेल.
कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांचेही नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये काँग्रेसचे आमदार फोडून भाजपात आणण्यात लोबो यांचे महत्त्वाचे योगदान होते. दिगंबरना मंत्रिपदाची बक्षिसी मिळाली. परंतु लोबो यांना काही संधी दिली नाही.
रवींच्या निधनाने रिक्त झालेल्या मंत्रिपदी लोबो यांची वर्णी लावली जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मुख्यमंत्र्यांनी पर्रा येथे झालेल्या लोबोंच्या वाढदिनाच्या भव्य कार्यक्रमातही लोबो यांना लवकरच चांगली बातमी देऊ असे म्हटले होते. त्यामुळे मंत्रिपदासाठी आता लोबो यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो.
फोंड्यात सहा महिन्यांत होणार पोटनिवडणूक; चर्चेला ऊत
कृषिमंत्री रवी नाईक यांच्या निधनामुळे फोंडा मतदारसंघातील विधिमंडळ सदस्याची जागा रिक्त झाली आहे. या पदासाठी सहा महिन्यांत पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. विधानसभा सचिवालयाने ही जागा रिक्त झाली असल्याची अधिसूचना काल काढली. केंद्रीय निवडणूक आयोगालाही जागा रिक्त झाल्याबद्दल कळवले आहे.
विधानसभेचा कार्यकाळ मार्च २०२७ पर्यंत आहे. त्यामुळे अजून दीडेक वर्ष बाकी आहे. नियमानुसार एखाद्या आमदार, झेडपी किंवा पंच सदस्याचे निधन झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत तेथे पोटनिवडणूक घ्यावी लागते. त्यामुळे फोंडा मतदारसंघातील लोकांना पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागेल. रवींचे दोन्ही पुत्र रितेश व रॉय हे सध्या फोंडा पालिकेत नगरसेवक आहेत. रवींचे वारसदार म्हणून भाजप यापैकी कोणाला उमेदवारी देतो की अन्य एखाद्याला तिकीट देतो, हे पहावे लागेल.
दरम्यान, भाजपचा मित्रपक्ष असलेल्या मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी म्हटले आहे की, भाजपने पुढील दीड वर्षांसाठी रवींचा पुत्र रितेश याला उमेदवारी द्यावी. भाजप व मगोपने मिळून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करावा. या कामी मगोपचे भाजपला पूर्ण सहकार्य असेल.'